लष्करभरतीच्या महत्त्वाकांक्षी नव्या ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केंद्र सरकारनं केल्यानंतर या योजनेला देशभरातून विरोध झाला होता. मात्र, पुढे ही योजना किती फायदेशीर आहे, हे पटवून देण्यात सरकारला यश आल्यानं या योजनेचा देशांतर्गत विरोध कमी झाला. त्यातच आता या योजनेअंतर्गत तयार झालेली अग्निवीरांची पहिली तुकडी सैन्यात भरती होत आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबत वृत्त दिलयं.
लष्कर, नौदल आणि हवाई दलात सैनिकांच्या भरतीसाठी सरकारनं 14 जून 2022 रोजी अग्निपथ योजना जाहीर केली होती. या अंतर्गत चार वर्षांच्या अल्प मुदतीच्या करारावर शिपाई भरती केली जात आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या अर्ध्याहून अधिक अग्निवीरांचा लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कार्यकाळ चार वर्षांनंतर संपणार आहे. त्यानंतर ते पुढे काय करणार? असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता. त्यावर केंद्र सरकारनं अग्निवीरांना खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाईल, असं ही योजना सुरू करताना सांगितलं होतं.
आता त्या दृष्टीनं सरकारनं पहिलं पाऊल उचललं आहे. अग्निवीरांना सशस्त्र दलांतील कार्यकाळानंतर रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी सरकारनं भारतीय संरक्षण उद्योगाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. या बैठकीला एल अँड टी, अदानी डिफेन्स लिमिटेड, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड, अशोक लेलँड यांच्यासह इतर मोठ्या संरक्षण कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, असं सांगण्यात आलं.
अग्निवीरांच्या कौशल्याचा कंपन्यांना होईल फायदा
संरक्षण कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 30 नोव्हेंबर रोजी बैठक झाली. आता संरक्षण मंत्रालयानं एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, भारतीय संरक्षण उद्योगातील कंपन्यांच्या कॉर्पोरेट भरती योजनेअंतर्गत सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या नेतृत्वाखाली ही बैठक बोलावण्यात आली होती. ज्या अग्निवीरांची सेवा चार वर्षांनंतर संपणार आहे, त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी शोधण्याविषयी यात चर्चा झाली. सशस्त्र दलांसोबत काम करताना अग्निवीर जी कौशल्यं आत्मसात करेल, ते कंपन्यांना अत्यंत सक्षम आणि व्यावसायिक कार्यबल तयार करण्यात मदत करेल. हे कुशल कामगार उद्योगाद्वारे उत्पादक आणि संरचनात्मक सहभागासाठी सहज उपलब्ध असतील, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
‘कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रयत्नाला सतत पाठिंबा देण्याचं वचन दिलं आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलात काम केलेल्या अग्निवीरांची भरती करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली,’ असं सांगतानाच संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं की, ‘संरक्षण सचिवांनी बैठकीत सहभागी होणाऱ्या कंपन्यांना म्हणजेच भारतीय संरक्षण उत्पादकांना त्यांच्या वचनबद्धतेवर काम राहण्याचं आणि कॉर्पोरेट भरती योजनेअंतर्गत लवकरातलवकर धोरणात्मक घोषणा करण्याचं आवाहन केलं आहे.’
दरम्यान, अग्निपथ योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या अग्निवीरांचा लष्कराला कसा फायदा होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.