काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली गेली. या दरम्यान त्यांनी आपली आई म्हणजेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्याचं कारण देत चौकशीपासून एक दिवसाची सुट्टी मागितली होती. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना तीन दिवसांची मुदतवाढ दिली होती. ईडीकडून राहुल गांधी यांना आज म्हणजे सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसकडून युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आज दिल्लीला बोलावण्यात आलं.
राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरुन देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलने केली जात आहे. आता काँग्रेसने युथ काँग्रेसच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आज दिल्लीत आंदोलनासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज देशभरातून तब्बल 40 हजारापेक्षा जास्त युथ काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिल्लीत काहीतरी मोठं होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.