आज दि.२० जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश केला जाण्याचे केंद्रिय शिक्षणमंत्र्यांचे संकेत

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ओळखला जातो. 2015 पासून दरवर्षी 21 जून रोजी देशभरात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून योग आणि त्यासंबंधीच्या शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून मोठी पावलं उचलण्यात येणार आहेत. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग लवकरच आपल्या अभ्यासक्रमात ‘योग’ समाविष्ट करणार असल्याचे संकेत दिले.

विधान परिषद निवडणूक: सर्व आमदारांचं मतदान पूर्ण

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची वेळ संपण्यापूर्वी १० मिनिटं आधीच सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. मतदानानंतर आता निकालाकडे सर्वांचे डोळे लागले असून ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. रात्री ८ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.

मतदानाच्या शेवटच्या क्षणी सुप्रीम कोर्टाकडूनही राष्ट्रवादीला धक्का, मलिक आणि देशमुखांना परवानगी नाहीच!

विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जवळपास सर्वच आमदारांनी मतदान पूर्ण केले आहे. मात्र, मतदानाला काही तास बाकी असताना सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी विधान परिषदेला मतदान करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दुपारी सुनावणी पार पडली. हायकोर्टापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही नवाब मलिक आणि देशमुख यांना परवानगी नाकारली आहे.

राज ठाकरेंची लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा आपल्या प्रकृतीमुळे तूर्तास स्थगित केला होता. आता त्यांच्या प्रकृती संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.राज ठाकरे यांच्या पायाला झालेल्या दुखापतीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळेच ते मागच्या महिन्यात पुणे दौरा अर्धवट दौरा सोडून मुंबईत आले होते. डॉक्टरांकडून राज ठाकरे यांना हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी लीलावती रुग्णालयात ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.

मुस्लिम मुली 16 व्या वर्षी करू शकतात लग्न, हायकोर्टाने का दिली अल्पवयीन विवाहास मान्यता?

16 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली मुस्लिम तरुणी तिच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्यास पात्र आहे, असा निकाल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सोमवारी (20 जून) दिला आहे. हा निकाल देतानाच हायकोर्टाने 16 आणि 21 वर्षं वय असलेल्या एका मुस्लिम जोडप्याला त्यांच्या कुटुंबीयांपासून संरक्षणही दिलं आहे. न्या. जसजितसिंग बेदी यांच्या एकसदस्यीय पीठाने हा निर्णय दिला. ‘इंडिया टुडे’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

मुस्लिम मुलीच्या लग्नासाठी मुस्लिम पर्सनल लॉ  पाळणं आवश्यक असतं, असं सांगून न्या. बेदी यांनी इस्लामिक शरिया कायद्याचा संदर्भ दिला.

रोप वे मध्ये 11 लोक अडकले; शेकडो फूट उंचीवर NDRF चं रेस्क्यू ऑपरेशन सुरू

हिमाचल प्रदेशातील सोलनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील परवानू ट्रिंबर ट्रेल रोपवेमध्ये तब्बल 11 लोक अडकल्याची घटना घडली आहे. सुमारे तासभर हे लोक हवेत अडकले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून रोपवेमध्ये अडकलेल्या 8 जणांची सुटका करण्यात आली आहे. उर्वरित 3 जणांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सांगली जिल्ह्यात मिरजेजवळ एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या

सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

डॉक्टरही पाहून हादरले; तरुणाच्या पोटातून निघाले 250 खिळे, 35 नाणी

पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात एका तरुणाच्या सर्जरीदरम्यान डॉक्टरांनी असं काही पाहिलं की ते हैराण झाले. या व्यक्तीच्या पोटातून 250 खिळे, 35 नाणी आणि स्टोन चिप्स आढळले. मानसिक विकृत असलेला हा तरुण गेल्या 15 वर्षांपासून खिळे खात होता.

वर्धमान मेडिकल कॉलेज अँड रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्जरीकडून या सर्व वस्तू काढल्या. आता त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचं नाव शेख मोइनुद्दीन आहे. तो मंगलकोट भागातील राहणारा आहे. तो गेल्या शनिवारपासून जेवत नव्हता. तीव्र पोटदुखी सुरू असल्यामुळे त्याला वर्धमानातील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आलं. येथे एक्सरे केल्यानंतर डॉक्टरही हादरले.

सिक्स मारून क्रिकेटचा सामना जिंकला पण आयुष्याचा सामना हरला

2 चेंडूत 4 धावा आवश्यक असताना खेळपट्टीवर उभ्या असलेल्या खेळाडूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच षटकार मारणाऱ्या क्रिकेटपट्टूवर काळाने झडप घातली. सामना जिंकल्यानंतर घरी जात असताना 45 वर्षीय व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे घडली. संजय ठाकरे (वय 45 रा.अंबाडी) यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गोविंद ठाकरे हे उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. रविवारी 45 वर्षां वरील खेळाडूंसाठी 45 प्लस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील घोटगाव येथे केले होते.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.