जगातील अब्जाधीश देशांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे. फोर्ब्ज मासिकाने जगातील श्रीमंतांची नवी यादी प्रसिद्ध केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी चिनी उद्योगपती जॅक मा यांना मागे टाकून आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचे स्थान परत मिळवले आहे.
फोर्ब्जच्या जगातील अब्जाधीशांच्या पस्तिसाव्या वार्षिक यादीत अॅमॅझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व संस्थापक जेफ बेझोस हे सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थानावर आहेत. त्यांची निव्वळ मालमत्ता १७७ अब्ज अमेरिकी डॉलरची असून अॅमॅझॉनच्या समभागांमध्ये वाढ झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या मालमत्तेत ६४ अब्ज डॉलरची भर पडली आहे.
जागतिक यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क हे असून, डॉलरच्या संदर्भात सर्वाधिक जास्त फायदा त्यांना झाला आहे. गेल्या वर्षीच्या यादीत २४.६ डॉलर मालमत्तेसह ते ३१व्या क्रमांकावर होते. यंदा त्यात तब्बल १२६.४ डॉलरची प्रचंड वाढ होऊन ही मालमत्ता १५१ अब्ज डॉलर झाली आहे. ‘टेस्लाच्या समभागांमध्ये झालेली ७०५ टक्क्यांची वाढ हे याचे मुख्य कारण आहे’, असे फोर्ब्जने सांगितले आहे.
मुकेश अंबानी अब्जाधीशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर
भारतातील आणि आशियातीलही सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे जागतिक अब्जाधीशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. ८४.५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मालमत्तेसह त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे आपले स्थान परत मिळवले आहे.
‘अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत व त्यांची मालमत्ता ८४.५ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. गेल्या वर्षी आशियातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या जॅक मा यांना त्यांनी मागे टाकले आहे. मा यांच्या मालमत्तेत १० अब्ज डॉलरनी वाढ होऊन ती ४८.४ अमेरिकी डॉलर झाल्यानंतरही त्यांचा क्रमांक गेल्या वर्षीच्या १७ वरून आता २६ पर्यंत घसरला आहे’, असे फोर्ब्जने नमूद केले. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे ५०.५ अब्ज डॉलर मालमत्तेसह जागतिक यादीत २४व्या क्रमांकावर आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. पूनावाला समूहाचे अध्यक्ष आणि सीरम इन्स्ट्यिूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला १२.७ अब्ज अमेरिकी डॉलर मालमत्तेसह फोर्ब्ज च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत १६९व्या क्रमांकावर आहेत. भारतीय अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा क्रमांक सातवा आहे.