आज दि.२० मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

जालना जिल्ह्यात तब्बल
103 डॉक्टर्स बोगस

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याच जालना जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जालना जिल्ह्यात तब्बल 103 डॉक्टर्स बोगस निघाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याच आदेशावरून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांची शोध मोहीम सुरू केली आहे.

सहाव्या जागेसाठी सेनेची मोर्चेबांधणी सुरू, मुख्यमंत्र्यांनी 9 अपक्ष आमदारांना ‘वर्षा’वर बोलावले

राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता सूत्र आपल्या हातात घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज दुसऱ्या दिवशी अपक्ष आमदारांना भेटीसाठी बोलावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर अपक्ष आमदारांसोबत बैठक होत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. भाजपने त्यांचा तिसरा उमेदवार जर उभा केला तर प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. मग अपक्ष आमदारांचे मत मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच होऊ शकते. हा घोडाबाजार टाळण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अपक्ष आमदरांशी चर्चा करण्याासाठी बैठक बोलावली आहे.

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण ब्राह्मण महासंघाने नाकारले, केतकी चितळेचा मुद्दाही केला उपस्थित

राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावले आहे. मात्र, केतकी चितळे प्रकरण, अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने शरद पवार यांच्या भेटीचे निमंत्रण नाकारले आहे. या बैठकीला आमचा कोणताही पदाधिकारी जाणार नाही, अशी भूमिकाच महासंघाने घेतली आहे.

मान्सून लवकर येणार पण पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, कृषिमंत्र्यांनी केलं अलर्ट

राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे दरम्यान हा पाऊस कदाचित हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस असल्याने कदाचित हा पाऊस थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस नाही लागल्यास पेरणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान होते. दरम्यान आज कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

भाजपा पदाधिकाऱ्यांना २५ वर्षांच्या
दृष्टीने पावलं उचलण्याचे निर्देश

एकीकडे महाराष्ट्रात भोंगे, हनुमान चालीसा, नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना राष्ट्रीय स्तरावर गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडी सुरू झाल्या आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये भाजपाच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा पदाधिकाऱ्यांना पुढील २५ वर्षांच्या दृष्टीने पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. राजकीय पक्ष म्हणून लोकांसाठी काम करण्याचं देखील आवाहन केलं आहे

भारतातून 61,500 टन
गहू इजिप्तला पाठवला

गव्हाच्या निर्यातीवर बंदी असतानाही भारताने इजिप्तमध्ये गव्हाची मोठी खेप पाठवली आहे. इजिप्तच्या विनंतीनंतर भारतातून 61,500 टन गहू इजिप्तला पाठवण्यात आला आहे. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर भारताने कोणत्याही देशाला दिलेली ही सर्वात मोठी खेप आहे. इजिप्तप्रमाणेच 12 देशांनी भारताला गहू निर्यात करण्याची विनंती केली आहे.

नवज्योत सिंग सिद्धूचे पटियाला
न्यायालयासमोर आत्मसमर्पण

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज पटियाला न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. आता त्यांना एक वर्ष तुरुंगात काढावे लागणार आहे. सिद्धू सध्या वैद्यकीय तपासणीसाठी पटियाला येथील माता कौशल्या रुग्णालयात पोहोचले आहेत. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धूंचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही दिलासा मिळण्याच्या आशेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, मात्र तेथूनही त्यांना दिलासा मिळाला नाही.

परभणी जिल्ह्यात
विस्फोटक पदार्थ जप्त

दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई केली आहे. परभणी जिल्ह्यात जिलेटीन कांड्या आणि डिटोनेटरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात दहशतवादी विरोधी पथकाने जिंतूर मंठा रोडवरील डोनवाडा भागातून मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ असलेल्या जिलेटीन कांड्या आणि डिटोनेटर जप्त केले आहेत.

राज ठाकरे यांचा
अयोध्या दौरा स्थगित

मागील अनेक दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून जोरदार विरोध होतोय. त्यांना यूपीतील साधुसंतांचाही पाठिंबा मिळालाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला आहे. याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

येरवडा कारागृहात पाणी भरण्यावरून
दोन कैद्यांना सिमेंटच्या पत्र्याने मारहाण

येरवडा कारागृहात पिण्याचे पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून दोन कैद्यांना सिमेंटच्या पत्र्याने मारहाण करण्यात आली. या घटनेत दोन कैदी जखमी झाले असून मारहाण प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. टिकलसिंह गब्बरसिंह, अजिनाथ लक्ष्मण गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. दोघांनी केलेल्या मारहाणीत कैदी सोनू शेटे, किशोर मंजुळे जखमी झाले आहेत. कारागृह अधिकारी अभिजीत यादव यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक एक कार्यालयासमोर कैदी टिकलसिंह, अजिनाथ गायकवाड यांचा सोनू शेटे, किशोर मंजुळेशी वाद ‌झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोघांनी सिमेंटच्या पत्र्याने शेटे आणि मंजुळेला मारहाण केली.

चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अपघातात
नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे अपघातात नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजयपूर गावाजवळ मध्यरात्री रात्री २ ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. डिझेल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर टँकरमधील डिझेलमुळे भीषण आगीचा भडका उडालाय. ट्रकचे टायर फुटल्याने आग अधिकच पसरली. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग विझवली. मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह खाक झाले.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.