सुशील कुमारला तिहार जेलमधल्या
बरॅकमध्ये हवा टीव्ही
युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये असलेला भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याने आता नवी मागणी केली आहे. सुशील कुमारला तिहार जेलमधल्या त्याच्या बरॅकमध्ये टीव्ही हवा आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनीच यासंदर्भातली माहिती दिली आहे. नुकतीच, दिल्ली न्यायालयाने सुशील कुमारची विशेष जेवण आणि कुस्तीपटूचा आहार मिळण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर आता त्याने टीव्हीची मागणी केली आहे. कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी माहिती होण्यासाठी टीव्ही हवा असल्याचं म्हटलं आहे.
भारतीय कोवॅक्सिनवरुन
ब्राझिलमधील वातावरण तापले
भारतीय बनावटीची लस कोवॅक्सिनवरुन ब्राझिलमधील वातावरण प्रचंड तापले आहे. तब्बल २४०० कोटी रुपयांमध्ये २ कोटी लस खरेदी करण्याचा करार ब्राझिल सरकारने भारतीय कंपनी भारत बायोटेकशी केला होता. चढ्या दरात ही लस खरेदी करण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर ब्राझिलमधील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. ही बाब लक्षात घेताच ब्राझिल सरकारने हा लस खरेदी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारत बायोटेकला मोठा झटका बसला आहे.
इराणमध्ये पाचव्या लाटेचा धोका
आता ब्रिटन व रशिया मध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यातच इराणमध्ये पाचवी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कोरोना साथीच्या दोन लाटेंचा सामना करणाऱ्या ब्रिटन आणि रशियामध्ये आता आणखी डेल्टा व्हेरीएंट या धोकादायक विषाणूचा कहर पुन्हा वाढू लागला आहे. परिणामी, दोन्ही देशांमध्ये दररोजच्या संसर्गाच्या आणि मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याच वेळी इराणमधील पाचव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.
चीनच्या दोन अंतराळवीरांचा
अंतराळात स्पेसवॉक
चीनच्या दोन अंतराळवीरांनी अंतराळात स्पेसवॉक करत नवा इतिहास रचला आहे. लियु बोमिंक आणि तांग होंग्बो या दोघांनी एअरलॉकमधून बाहेर पडत स्पेसस्टेशनवर काम केलं. रोबोटिक आर्मची सेटिंग करण्यासाठी ते बाहेर आले होते. या दोघांनी १५ मीटर लांब रोबोटिक आर्म इन्स्टॉल केला. तर तिसरे क्रू मेंबर कमांडर निए हॅशेंग आतच होते. यावेळी टिपलेल्या दृश्यांमधून अंतराळातून पृथ्वी दिसत आहे. चीनच्या सरकारी टिव्हीने हे फुटेज दाखवले आहेत. चीनचे तीन अंतराळवीर १७ जूनला तिसऱ्या ऑर्बिटल स्टेशनवरील कामासाठी तीन महिन्यांच्या मिशनवर आहेत.
गूगल आणणार
हेल्थ विषयक ॲप
सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध व्हावी, म्हणून गूगल कंपनी सध्या गूगल हेल्थ अॕप या नव्या अॕपवर काम करत असून लवकरच ते लॉन्च केले जाऊ शकते. सदर अॕप लोकांना ऑनलाइन पध्दतीने वैद्यकीय नोंदी संकलीत करण्यास उपयुक्त ठरणार आहे. अॕप मोबाईल वापरकर्त्याच्या मेडिकल हिस्ट्री (वैद्यकीय इतिहास) याची नोंद वेगवेगळ्या आरोग्य सुविधांमधून गोळा करेल. त्यामुळे अॕप वापरकर्ते एका क्लिकवर त्यांच्या आरोग्य डेटामध्ये प्रवेश करू शकतील.
किरकोळ वाटणारे आजार देखील
कोरोनाची लक्षणे असू शकतात
गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून पहिल्या आणि दुसऱ्या लाटे नंतर आता तिसरी लाट आली आहे. त्यातच कोरोना केवळ त्याचा प्रकार बदलत नसून लक्षणे देखील बदल आहेत. डेल्टा व्हेरिएंट मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना आता साधे सर्दी-पडसे किंवा घसा खवखवणे यासारखे किरकोळ वाटणारे आजार देखील कोरोनाची लक्षणे असू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
१९६ भारतीय भाषा सध्या
धोकादायक स्थितीत
दर दोन आठवड्यात, जगातील एक भाषा अस्तंगत होत असते, या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचा हवाला देत, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सध्या १९६ भारतीय भाषा सध्या धोकादायक स्थितीत असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, ही स्थिती बदलून, या भाषा जतन करण्यासाठी ठोस कृती आणि एकत्रित प्रयत्नांची गरज आहेत. सगळे भारतीय एकत्र होऊन आपल्या भाषांचे जतन करतील, अशी आशाही व्यक्त केली.
दक्षिण आफ्रिकेत महिलांना
एकापेक्षा अधिक विवाह करण्याचा अधिकार
दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकेतील सरकारच्या गृह विभागाने महिलांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याचा कायदेशीर अधिकार देण्याचा विचार मांडला असून त्याचा ग्रीन पेपरमध्ये समावेशही केला आहे. म्हणजेच सरकारचा निर्णय जवळपास झाला आहे. त्यामुळे रुढीवाद्यांकडून जोरदार विरोध होत आहे. हा विचार मांडताना लग्न अधिक समावेशी होईल, असा दाखला सरकारने दिला आहे. विवाह धोरण बळकट करण्यासाठी लोकांशी चर्चा करणार आहे.
अँटिबायोटिकच्या २१.६४ कोटी
डोसचा अधिक वापर
देशात कोरोना महामारीदरम्यान औषधांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे. भारतात पहिल्या लाटेदरम्यान अँटिबायोटिकचा अधिक वापर झाल्याचा दावा अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या बाधितांच्या उपचारात अँटिबायोटिकचा अतिवापर झाला आहे. त्यामुळे अँटिबायोटिकची विक्रीसुद्धा वाढली आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान जून २०२० पासून ते सप्टेंबर २०२० पर्यंत अँटिबायोटिकच्या २१.६४ कोटी डोसचा अधिक वापर झाला आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी
अध्यक्ष दिग्विजय कापाडिया यांचे निधन
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापाडिया (७६) यांचे आज पहाटे निधन झाले. अशोका मेडीकव्हर रुग्णालयात ते गेले काही दिवस उपचार घेत होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कापाडिया हे ऑल इंडिया क्लॉथ मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष सुध्दा होते. त्यांनी रेल्वेच्या विभागीय व झोनल समितीवर सदस्य म्हणून अनेक वर्षे काम केले.
SD social media
9850 60 3590