पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात धामी यांना पद आणि गोपनीयतेची आज शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत सतपाल महाराज, हरक सिंह रावत या ज्येष्ठ नेत्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. तसेच वंशीधर, यशपाल आर्य, बिशन सिंह आणि सुबोध उनियाल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.
आज संध्याकाळी राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात पुष्कर सिंह धामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यांच्याबरोबर सतपाल महाराज, धन सिंह रावत, विशन सिंह चुफल, मदन कौशिक, गणेश जोशी, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, रेखा आर्या, बंशीधर भगत आदी नेतेही शपथ घेण्यासाठी राजभवनात पोहोचले होते.
धामी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्याने सतपाल महाराज नाराज झाले होते. त्यामुळे पदाची शपथ घेण्यापूर्वी धामी यांनी सतपाल महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सतपाल महाराजही मंत्रिमंडळात येण्यास तयार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पुष्करसिंह धामी हे उत्तराखंडमध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्षही होते. 2002 ते 2008 पर्यंत त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. धामी यांचा जन्म टुंडी, पिथौरागड येथे झाला होता. त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील माजी सैनिक होते. उत्तराखंडमधील खटीमा विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा विजयी झाले आहेत. 2012 ते 2017 पर्यंत ते आमदार होते. 2017च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. अवघ्या दुसऱ्या टर्ममध्येच त्यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. त्यांनी 1990 ते 1999पर्यंत एबीव्हीपीमध्ये अनेक पदांवर काम केलं आहे. भाजयुमोच्या अध्यक्षपदी असताना सहा वर्ष राज्यात फिरून बेरोजगार तरुणांचं संघटन उभारल्याचा धामी यांचा दावा आहे. धामी हे खटीमा विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले आहेत. राज्यातील तरुण नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचेही असल्याचं सूत्रांनी सांगितलं.