एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दीड वर्षात नोकरी न मिळाल्याने नैराश्य आलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी अस्वस्थ आणि संतप्त झाले आहेत. आम्हाला लवकर नियुक्त्या द्या, नाही तर सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे.
स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर एमपीएससीचे विद्यार्थी एकवटले आहेत. 2019ला आम्ही एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत. 413 पदांसाठी ही परीक्षा झाली होती. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार आदी पदांसाठी ही परीक्षा होती. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आता दोन वर्ष होत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही मराठा आरक्षणावर निकाल दिला आहे. त्यालाही दोन महिने झाले तरीही आम्हाला नियुक्ती देण्यात आली नाही. आम्हाला नियुक्ती देण्यासाठी अधिक विलंब लावू नये. आम्हाला तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे, नाही तर आम्हाला सामुदायिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असं या पत्रात विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
आम्ही पाच ते सहा वर्षे अभ्यास करून परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत. आमचे आई-वडील शेतकरी, शेत मजूर आणि कामगार आहेत. देशात शेतकरी आत्महत्या होत असताना आम्ही जीवाचे रान करून सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी अभ्यास केला. परीक्षेत पास झालो आणि आम्ही निवडलेही गेलो. पण आम्हाला अजून नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाला आम्हाला सामोरे जावं लागत आहे, अशी व्यथाही या पत्रात मांडण्यात आली आहे.
एमपीएससीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं नव्याने अवलोकन करणं आवश्यक आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी एमपीएससीवरही तोफ डागली आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.
नैराश्यातून समाजातील विविध व्यथित घटक आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी आर्त हाक प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिली आहे. या युवकाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.