मराठा समाजाचे प्रश्न हे एका तासात निकाली लागू शकतात. पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे आहे. मात्र आम्हाला चर्चा किंवा वाद नको आहेत. त्यामुळे यावर पर्याय शोधा,” असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. संभाजीराजे हे संवाद दौऱ्यानिमित्त अकोल्यात आले असताना त्यांनी मराठा आरक्षणावरुन चांगलीच टीका केली.
मराठा आरक्षणावर सद्यस्थितीत समाजाची भूमिका काय? याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या राज्याचा दौरा करत आहेत. काल ते मराठा समाज जनसंपर्क दौऱ्याच्या निमित्ताने अकोल्यात होते. यावेळी त्यांनी अकोल्यातील मराठा मंगल कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी सभेत समाजाशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला.
“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आधी समाज बोलला. लोकही बोललेत. समाजानं आपल्या हक्कांसाठी आंदोलनं आणि महामोर्चेही काढलेत. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं हाती घ्यावा. त्यासाठी आता सरकारवर दबावासाठी समाजानं लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार-आमदारांना जाब विचारावा. मराठा समाजाला या लोकप्रतिनिधींनी उत्तर द्यावं. मराठा समाजाचे प्रश्न हे एका तासात निकाली लागू शकतात. पावसाळी अधिवेशन हे दोन दिवसांचे आहे. पण आम्हाला वाद नको आहे. त्यामुळे यावर पर्याय शोधा,” असे वक्तव्य संभाजी महाराज यांनी अकोल्यात केले.
दरम्यान त्यांना त्यांच्या पक्षस्थापनेबद्दल विचारले असता संभाजीराजे म्हणाले, “मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे मला ते पद भोगू द्या. माझा जन्म हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशात झाला आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय याकडे मी लक्ष देत नाही. मी कोणाला फसवणार सुद्धा नाही. अनेक जण शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर टीका करत आहेत. टीका करणारे करतात,” असेही संभाजी महाराज यावेळी म्हणाले.