आज दि.१४ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाकडून 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती

राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी होती. या मागणीचा विचार करता निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे. पण सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन 12 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला आहे.

गायक दलेर मेहंदी यांना 2 वर्षांची शिक्षा, न्यायालयाच्या सुनावणीनंतर तातडीने अटक

पतियाळा कोर्टाने गायक दलेर मेहंदी यांना 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. 15 वर्षे जुन्या मानव तस्करी केसमध्ये त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आज पतियाळा कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणात सुनावणीदरम्यान कोर्टाने दलेर मेहंदी यांना दोषी करार दिला आहे. काही वेळानंतर शिक्षाही सुनावण्यात आली.कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने दलेर मेहंदी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 2003 मध्ये सदर पोलिसांनी बल बेडा गावात राहणारे बक्शीस सिंह हिच्या तक्रारीनंतर दलेर मेहंदीचे भाऊ शमशेर मेहंदी ध्यान सिंह आणि बुलबुल मेहताविरोधात परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक करीत 20 लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

थोडी कळ सोसा; 2 दिवसानंतर राज्यात पाऊस घेणार विश्रांती; पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले, धबधबे दुथडी बनून वाहत आहेत. त्यामुळे अनेक अपघातं घडल्याचं समोर आलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे अशा धोकादायक ठिकाणी पर्यटनास 17 जुलैपर्यंत बंदी आणली आहे. या परिसरात 17 जुलैपर्यंत कलम 144 लागू असेल. तसेच पुणे जिल्ह्यातील पाच तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमधील शाळांना 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या महाप्रचंड पावसाबद्दल हवामान खात्याकडून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.अजून दोन दिवस महाराष्ट्रात मान्सून बरसणार आहे मात्र त्यानंतर संपूर्ण राज्यभरात पावसाचा जोर कमी कमी होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. अमुपम कश्यपी यांनी न्यूज18 लोकमतला दिली आहे. 

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, केंद्राची टीम साई रिसॉर्टवर दाखल, चौकशी सुरु

राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने अनिल परब यांच्या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी चौकशीसाठी नेमलेली समिती साई रिसॉर्टवर दाखल झाली आहे. पर्यावरण खात्याची पाच जणांची टीम मुरुडमधील रिसॉर्टवर दाखल झाली आहे. या टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत.साई रिसॉर्टमध्ये दाखल झालेल्या टीमकडून आतापर्यंत नेमकी काय कारवाई झाली याची चौकशी सुरु आहे. तसेच पर्यावरणाच्या हानीचीदेखील या टीमकडून चौकशी सुरु आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसॉर्टने सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. 

5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; आता या दिवशी होईल परीक्षा

राज्याच्या काही भागांमध्ये अति मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अनेक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. त्यात आता हवामान विभागानं पुणे, काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे, पालघर या जिल्ह्यामधील शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र आज एक मोठा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना भर पासवसत परिक्षा देण्यासाठी जावं लागणार नाहीये. ही शिष्यवृत्ती परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे . एक परिपत्रक काढून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. आता या परीक्षा दि.३१ जुलै २०२२ रोजी होतील.

बिहार पोलिसांनी सर्वात मोठा घातपाताचा कट उधळला, दहशतवाद्यांचं भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचं मिशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जुलैला बिहारच्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यादरम्यान अतिरेक्यांचा पाटण्यात मोठा घातपात घडवण्याचा डाव होता. या घातपाताविषयी माहिती मिळाल्यापासून पोलीस कामाला लागले होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघांपैकी एक आरोपी हा निवृत्त पोलीस निरीक्षक आहे. तर दुसरा आरोपी हा पाटणाच्या गांधी मैदानात बॉम्बस्फोट घडवून आणणारा आरोपी मंजरचा सख्खा भाऊ आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या झारखंडच्या माजी पोलीस निरीक्षकाचं मोहम्मद जलालुद्दीन असं नाव आहे. तर दुसऱ्या आरोपीचं अतहर परवेज असं नाव आहे. या आरोपींकडे मिळालेल्या कागदपत्रांमध्ये भारताला 2047 मध्ये मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा उल्लेख करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

श्रेयस तळपदे; कंगनाच्या इंदिरा गांधींबरोबर झळकणार मराठमोळा अभिनेता; Emergency मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे हा सतत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असतो. तो यशवर्धन चौधरी म्हणून टेलिव्हिजन तर गाजवत आहेच. पण येणाऱ्या काळात मोठा पडदा गाजवायला देखील श्रेयस सज्ज झाला आहे. आता तो पुन्हा एकदा  बॉलिवूडच्या नव्या कोऱ्या चित्रपटातून वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटात श्रेयस तळपदे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच कंगनाने तिच्या सोशल मीडियावरून प्रेक्षकांना हि बातमी दिली आहे. कंगना या चित्रपटामध्ये भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. हा इंदिरा गांधीजीवरील बायोपिक नसून इतिहासातील एका महत्वपूर्ण घटनेवर आधारित चित्रपट आहे. अभिनेत्री कंगना रानौत दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटामध्ये श्रेयसची भूमिका नेमकी काय असेल याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही. पण तो एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे हे नक्की.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.