विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार झाले असले, तरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप देण्याचा माझा विचार नाही. मी विश्वविजेता म्हणून आणखी काही सामने खेळण्यास उत्सुक आहे, असे म्हणत अर्जेटिनाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीने निवृत्तीच्या चर्चाना पूर्णविराम दिला.
लुसेल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात अर्जेटिनाने अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला ४-२ अशा फरकाने पराभूत करत तब्बल ३६ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. ३५ वर्षीय मेसीचा हा विश्वचषकातील अखेरचा सामना होता आणि त्याने आपल्या विश्वचषकातील प्रवासाची विजयी सांगता केली. मेसीने या स्पर्धेत सात गोल केले. चार वर्षांनी होणाऱ्या पुढील विश्वचषकात मेसी खेळणार नसला, तरी त्याचा अर्जेटिनाकडून आणखी काही सामने खेळण्याचा मानस आहे.