मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी विवाहबद्ध होत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. हार्दिक जोशी-अक्षया देवधर, आशय कुलकर्णी, सुमीत पुसावळे हे कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. काही दिवसांपूर्वीच टेलिव्हिजन विश्वातील अभिनेता संकेत पाठकचा साखरपुडा पार पडला.
आता मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चेतन वडनेरेचा साखरपुडा झाला आहे. चेतनने अभिनेत्री ऋतुजा धारप हिच्यासह साखरपुडा उरकत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. मित्रमैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत चेतन व ऋतुजाचा साखरपुडा समारंभ पार पडला.
चेतनच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करत चेतन व ऋतुजाला शुभेच्छा दिल्या आहेत. चेतन व ऋतुजाने मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत चेतन शशांक ही मुख्य भूमिका साकारत आहे. याआधी ‘फुलपाखरु’, ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकांमध्येही दिसला होता. तर ऋतुजाने ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.