चीनमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन उत्परिवर्तनाच्या नव्या वेगाने पसरणाऱ्या विषाणूमुळे रुग्णसंख्या वाढत असतानाच सोमवारी आणखी दोन करोनाबळींची नोंद झाली. अडीच कोटी लोकसंख्येच्या बीजिंग शहरात बहुसंख्य लोकांना या विषाणूची लागण झाली असून त्यात परदेशी दूतावासांचे अधिकारी- कर्मचारी यांचाही समावेश आहे. यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.
चीनच्या शून्य करोना धोरणाविरोधात नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर निदर्शने केल्यानंतर अनेक करोना निर्बंध शिथिल करण्यात आले. तेव्हापासून प्रथमच अधिकृतपणे या करोना मृत्यूंची माहित देण्यात आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या शहरांत सध्या ओमायक्रॉनची बीए.५.२ आणि बीएफ.७ ही उत्परिवर्तने वेगाने पसरत आहेत. बीजिंगमध्ये बीएफ.७ प्रकारचा विषाणू पसरत असून तो करोनाचा सर्वात वेगाने पसरणारा विषाणू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. शहरातील ७० टक्के नागरिकांना या विषाणूची बाधा झाल्याने काही लाख लोक घरातच अडकून पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.