मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता या दौऱ्याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तब्येतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित होण्याची चर्चा होत आहे. मात्र, या संदर्भात मनसे कडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.
पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईत आले. राज ठाकरेंच्या पायाला दुखापत झाली असून त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच राज ठाकरे पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज ठाकरे यांचा दौरा स्थगित होणार याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पायाला झालेल्या दुखापतीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे हे पुणे दौरा अर्धवट दौरा सोडून मुंबईत आले. डॉक्टरांकडून राज ठाकरे यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया कधी करायची याबाबत निर्णय राज ठाकरे घेत आहेत. डॉक्टरांसोबत चर्चा केल्यावर राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील.
शस्त्रक्रिया जर पुणे दौऱ्यानंतर झाली तर अयोध्या दौऱ्याला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा राज ठाकरेंचा अयोध्या दौरा 5 जून रोजी होणार हे निश्चित आहे. त्या दौऱ्याच्या संदर्भात सर्व तयारी सुद्धा झाली आहे. जर आत्ताच शस्त्रक्रिया झाली तर दौरा स्थगित होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेनंतर या संदर्भात अधिक माहिती समोर येम्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजप खासदाराचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध
राज ठाकरेंनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा सुद्धा केली. मात्र, या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. उत्तरभारतीयांना झालेल्या मारहाण प्रकरणात जोपर्यंत राज ठाकरे उत्तरभारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत उत्तरप्रदेशात येऊ देणार नाही अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली आहे.