तहसील व पोलिस ठाण्यामध्ये दिले निवेदन
माहूर:- दैनिक लोकपत्र चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा व लोकशाहीच्या चौथ्या खांबाच्या मुस्कटदाबी चा तालुका मराठी पत्रकार संघ व तानु बाई बिर्जे पत्रकार संघाने तहसीलदार व पोलीस निरीक्षक माहूर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना आज संयुक्त निवेदन देऊन निषेध नोंदविला.
‘शेंदाड नाऱ्याचा भयताड पोऱ्या गांजा मारतोय की चपट्या कोऱ्या’ या मथळ्याखाली ‘लोकपत्र’मध्ये काल रविवारी लेख छापून आला होता. त्यामुळे वाद निर्माण होऊन लोकपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर काही राणे समर्थक लोकांनी औरंगाबाद येथील लोकपत्रच्या कार्यालयात जाऊन हल्ला केला.
माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यावर लिहिलेल्या लेखामुळे राणे यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन हा हल्ला केला व यावेळी संपादक रविंद्र तहकीक यांना काळं फासण्यात आलं. तसेच कार्यालयात गोंधळ घालण्यात आला. पत्रकारांनी निर्भीड व परखडपणे लिखाण करून वास्तव जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दंडेलशाही चा अवलंब करणे ही बाब लोकशाहीला अत्यंत घातक असून औरंगाबाद मध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लिखाण स्वातंत्र्यावर गदा आणणार्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ तालुका मराठी पत्रकार संघ व तानु बाई बिर्जे पत्रकार संघाकडून निषेध नोंदविण्यात आला.या वेळी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सरफराज दोसानी, तानु बाई बिर्जे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकिने,साजिद खान,राज ठाकुर, गजानन भारती साकुरकर,संजय सुरोशे,संजय सोनटक्के,ज्ञानेश्वर पवार,राज ठाकुर,गजानन वी भारती,
राजकिरण देशमुख, सिद्धार्थ तामगाडगे, पुंडलीक पारटकर,अर्जुन जाधव, अविनाश टनमने, यांची उपस्थिती होती.यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार गोविंदवार यांनी तर पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी निवेदन स्वीकारले.
राजकीरण देशमुख माहूर/नांदेड