कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी लसीकरण झालेल्या नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात आपापली धोरणे जाहीर केली आहेत. या नियमांमुळे कोव्हॅक्सिन (covaxin) लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
कारण बहुतांश देशांनी त्यांच्या देशातील नियामक यंत्रणांनी मंजुरी दिलेल्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपतकालीन यादीत असलेल्या लसींचाच वापर ग्राह्य धरला आहे. यामध्ये सिरमची कोव्हिशिल्ड, मॉडर्ना, फायझर, अॅस्ट्राझेन्का (टू), जान्सेन, सिनोफार्म या लसींचा समावेश आहे. या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश नसल्याने आता ही लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
भारत बायोटेकने संबंधित यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे विनंतीही केली आहे. मात्र, WHO कडून लसीच्या परिणामासंदर्भात आणखी माहिती गरजेची असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे WHOच्या आपातकालीन यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. याविषयी भारत बायोटेक कंपनीनेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इमिग्रेशन धोरणासंबंधीचे जाणकार विक्रम श्रॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिन लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपातकालीन यादीत किंवा अन्य देशांकडून लसीला परवानगी मिळण्याची गरज आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय प्रवासावेळी कोव्हॅक्सिन घेतलेल्या व्यक्तीचे लसीकरणच झाले नाही, असे ग्राह्य धरण्यात येईल. तसे घडल्यास संबंधित व्यक्तीला आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सोमवारपासून पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात असून त्या दरम्यान करोनावरील लस आणि देशांतर्गत लस उत्पादनाला चालना देण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीबाबत ते प्रामुख्याने चर्चा करणार आहेत. जयशंकर हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅन्थनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा करणार असून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन प्रशासनातील अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. जयशंकर हे 24 ते 28 मे या दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.