भुसावळ खाद्यभ्रमंती : 10
भुसावळपासुन 17-18 कि.मी. वर अट्रावल येथे मुंजोबाचे स्थान आहे.जानेवारीे ते मार्चच्या दरम्यान ,येथे मोठी यात्रा असते , अनेक जण येथे आपआपले नवस फेडायला येतात..मंदीर बरेच पुरातन आहे, अट्रावल भालोद रस्त्यावरअसलेलं हे मंदीर 200-300 वर्षे पुरातन आहे असं म्हणतात. आपला नवस हा परीवारासहीत फेडायचा अशी एक सर्वसाधारण पध्दत असते ,पण भुसावळ याला अपवाद..ज्याचा नवस आहे तो गांव नाही ,तरी किमान गल्लीतली जवळपास सर्व मंडळी ,इतर नातेवाईक ,मित्र असे सर्व गोळा करायचे,मग ट्रकने निघायचे, कि अर्ध्या – एक तासात अट्रावल..पण त्याआधी या नवसाच्या प्रसाद तयार करण्यासाठी, एक टिम आधीच, अट्रावलला रवाना झालेली असे..मंदिराच्या आसपासचे शेतकरी ,अश्या सर्व भाविकासाठी आपले रान मोकळे ठेवतात ,कि जेणे करुन नवसाचा स्वयंपाक तिथे करता यावा ,मंदिराचे सर्वेसर्वा हा कोळी समाज असुन देखील ,येथील प्रसाद हा शाकाहारी असतो. वरण बाफले आणि वांग्याची भाजी..बाफले आणि बट्टया यांच्यात बेसिक फरक म्हणजे बाफले हे भाजले जातात व बट्टया या तळल्या जातात. जी स्वयंपाकाची टिम आधी रवाना झालेली असे ,तीचे काम सकाळीच सुरु व्हायचे, गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला नेमुन दिलेल्या शेतात ”चर” ( आयत आकाराचा खड्डा ) खणणे. चर खणुन झाल्यावर त्यावर गोव-या अंथरायच्या व त्या पेटवायच्या,एकिकडे गव्हा, रवा व मका यांचे जाडसर पीठ, जरा घट्ट मळुन, त्याचे उंडे ( गोळे ) तयार करायचे ,एक एक गोळा चांगला, आपल्या मुठीपेक्षा मोठा. तोपर्यंत गोव-यां जळुन, त्यांचा निखारा होतो. या निखा-यांमध्ये हे उंडे टाकायचे व त्यांच्यावरुन हिच निखा-याची राख पसरवायची …व निवांत अट्रावलच्या यात्रेत फिरुन यायचे.. म्हणजे दोन तीन जणांना थांबाव लागत, बाफले उलट सुलट फिरवायला..दोन तीन तासात बाफले चांगले खरपुस भाजले जातात…देवदर्शन झाले शेतातच पंगती बसतात.. केळीची पान भराभरा मांडली जातात…त्यावर हे बाफले, भाजी,.. वरण व लिंबाची फोड..हे खरपुस बाफले चुरायचे त्यात वरण व वरुन तूप..सोबत आपली नेहमीची वांग्याची भाजी..असे धुराळलेले..( आजच्या मराठीत : स्मोकी ) बाफले व भाजी हाणल्यानंतर आपला ट्रक शोधायला जरा अडचणच व्हायची ,कारण तोपर्यंत डोळे हे चायनीज झालेले असत….जसे हे नवस ..तसेच शेतातल्या पार्ट्या देखील रंगतदार.. 70% समाज हा शेतकरी, ब-यापैकी शेती बाळगुन असलेला. त्यांच्या शेतात पार्टी करायची म्हणजे, त्यांचाच प्रचंड उत्साह ! ज्याला नाही त्याला आमंत्रण ,मग त्यात कोणोचे वाद ,भांडण ,कुरकुरी असत ,अशांना मुद्दाम एकत्र नेण्याचा घाट घातला जाई…मग अशी सर्व विसंवादी मंडळींची मोट बांधुन ,त्यांना शेेतात आणली जाई..बेत तोच…त्यात बदल नाही ..कधी कधी बाफल्यांच्या ऐवजी बट्टया..तेच पीठ, तसेच उंडे, फक्त भाजण्या ऐवजी उकडुन घ्यायचे व नंतर त्याचे चार भाग करुन सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे ,कि झाल्या बट्टया..या मेन्यु मध्ये जास्तीतजास्त बदल म्हणजे ,याऐवजी “भरीत भाकरी” (भरीताची रेसीपी तर आपण पाहलीच आहे ) फक्त शेतात भरताची वांगी कि तूरकाट्यांवर भाजली जातात. गोवारीच्या वर भाजले जातात ते रोडगे, तळतो ती बाटी आधी पाण्यात उकळून नंतर तळतात ते बाफले. तूरकाट्या म्हणजे तूरीच्या शेंगा काढुन झाल्यावर उरलेली तूरीची वाळलेली रोपं त्यांचे भारे बांधुन ते वाळवले जातात व त्यावर हि भरताची वांगी भाजली जातात , अश्या भाजलेल्या वांग्याना तंदूरच्या थोबडीत मारेल अशी भन्नाट चव असते.. दुसरा बदल म्हणजे ” दाळ गंडोरीची भाजी ” व भाकरी ” , याला मिरचीची भाजी असंही म्हणतात,कारण यात होणारा मिरचीचा प्रचंड वापर ! तुरीची दाळ दोन एकदा धुवुन घ्यायची ,त्यातच आल व लसणाची पेस्ट ,भरपुर अख्ख्या हिरव्या मिरच्या ,आंबटचुका, पालक, हिरवे टोमँटो ,दाणे , बारीक हिरव्या वांग्यांच्या फोडी हे सर्व एकत्र शिजवुन घ्यायचे व शिजल्यानंतर हि भाजी घोटुन ,चांगली एकजीव करायची , नंतर फोडणीमध्ये दाण्याच कूट,धणे जिरे पूड,किसलेल खोबरं,आलं लसणांची पेस्ट,गरम मसाला ,कांदा टाकुन परतवुन घ्यायच व त्या हि घोटलेली भाजी घालायची ,उकळी येवुन तेल सुटल कि भाजी तयार…अशी भाजी व भाकरी शेतांवरच्या पार्ट्यांमध्ये फार लोकप्रिय..अश्या या शेतांंधल्या , यात्रेंतील पार्ट्या अजुनही होतात..नेण्या आणण्यापासुन सर्वकाही यजमानाकडे असत..आपण फक्त बेत हाणायला जायच…माझ्यामते ” सुख म्हणजे नक्की काय असत “? याच उत्तर म्हणजे, अश्या भरपुर पार्ट्यांना वेळोवेळी जावं, दुपारी तेच सुख डोळ्यांवर पांघरुन निवांत झोपी जावं !.. ” स्वस्थ रहा..अन् मस्त खा !
© सारंग जाधव