आंदोलक शेतकरी पाकिस्तानातून
आले आहेत का ? : छगन भुजबळ
केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन सुरू असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशानात केंद्राच्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी तीन कृषी विधेयक विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. शेतकरी आंदोलनासंदर्भातील केंद्राच्या भूमिकेवर टीका करताना “दोन-चार दिवसांचं आंदोलन किती त्रासदायक असतं. मग हे आंदोलन आठ महिन्यांपासून सुरू आहे. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का ?,” असा सवाल उपस्थित केला.
१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात
उच्च न्यायालयात जाणार
अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. याच्या निषेधार्थ भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. ही एकतर्फी कारवाई झाली असल्याची तक्रार करत, योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात उच्च न्यायालयात देखील जाणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ही माहिती दिली.
पंढरपूर व परिसरातील
नऊ गावांमध्ये संचारबंदी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा दुसऱ्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध घातले आहेत. १७ ते २५ जुलैपर्यंत नऊ दिवस पंढरपूर व परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू केली जाणार आहे.
धुळ्यातील जैतपूर गावात
19 मोरांचा दुर्दैवी मृत्यू
एक, दोन नव्हे तर तब्बल 19 मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील जैतपूर गावात घडली आहे. या मोरांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी किटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.
थावरचंद गहलोत
कर्नाटकचे नवे राज्यपाल
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असतांना मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांची मंगळवारी कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आली. यासह अन्य तीन नेत्यांना राज्यपाल केले गेले आहे. तसेच चार राज्यात फेरबदल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीही बदल्याचं
राजकारण झालं नाही : पटोले
भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पहायला मिळात आहेत. सोमवारी अध्यक्षांच्या दालनाबाहेर झालेल्या गोंधळाचा संदर्भ देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहातील भाजपाच्या सदस्यांकडून काल तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धमकावण्यात आल्याचा आरोप केलाय. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीही बदल्याचं राजकारण झालं नाही. मात्र कालच भाजपाच्या एका सदस्याने भास्कर जाधवांना अनिल देशमुख करण्याची आणि भुजबळ करण्याची धमकी दिल्याचं पटोले म्हणाले.
गांधी परिवाराने मोठे
नुकसान केल : अशोक पंडित
चित्रपट निर्माते अशोक पंडित राहुल गांधी आणि काँग्रेसवर कायम टीका करत असतात. आपल्या ट्विट्समुळे ते कायम चर्चेत असतात. आताही ते चर्चेत आले आहेत त्यांच्या नव्या ट्विटमुळे. या ट्विटमध्ये ते म्हणत आहेत की, दहशतवादी संघटनांनीही एवढं नुकसान केलं नाही जेवढं गांधी परिवाराने केलं आहे.
भारतीय प्रवाशांना मिळणार
आता जर्मनी मध्ये प्रवेश
भारत, ब्रिटन आणि पोर्तुगालमधील प्रवाशांवरील बंदी उठवण्याची घोषणा जर्मनीने केली आहे. देशातील करोनाच्या डेल्टा व्हायरस प्रकारामुळे सर्वाधिक प्रभावित देशांमधील प्रवाशांना बंदी घातली गेली होती. ती हटविण्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. डेल्टा प्रकारामुळे भारत आणि ब्रिटनमध्ये बर्याच प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. ब्रिटनमध्येही करोनाची नवीन बाधितांची नोंद सातत्याने केली जात आहे, तर भारतात दररोज सुमारे ४० बाधितांची नोंद केली जात आहे.
२८ लोक घेऊन जाणारे
रशियन विमान बेपत्ता
रशियातील पूर्वेकडील भागात कामचटका द्वीपकल्पात २८ लोक घेऊन जाणारे रशियन विमान बेपत्ता झाले, अशी माहिती प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका अहवालात देण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात आगमन झाल्यापासून हे विमान संपर्कात नाही.
भारत इंग्लंड मालिकेच्या आधी
इंग्लंडच्या तीन खेळाडूंना करोना
इंग्लंडच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या दोन दिवस आधी संघाचे तीन खेळाडू आणि चार सहाय्यक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. ८ जुलैपासून उभय संघांत एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. करोनाने संघात शिरकाव केला असला, तरी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ही मालिका वेळापत्रकानुसार होईल, असे सांगितले आहे. बेन स्टोक्स संघात परतला असून त्याला एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मालिकांसाठी संघाची कमान देण्यात आली आहे.
SD social media
9850 60 3590