महासाथीनंतर भारत यूकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाचव्या स्थानी आला. पण शेअर बाजार मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत खाली कोसळला. सर्वात मोठी घसरण ही रुपया कमजोर झाल्याची. या कालावधीत रुपया 10 टक्क्यांनी घसरला. रुपया गरीब झाला ज्याचा फटका देशातील बऱ्याच श्रीमंतांना बसला. पण काही श्रीमंतांवर मात्र याचा उलट परिणाम झाला. हे श्रीमंत अधिकच श्रीमंत झाले.
फोर्ब्सच्या माहितीनुसार भारतातील 100 सर्वात श्रीमंतांच्या एकूण संपत्ती वाढ झाली आहे. या सर्वांची संपत्ती एकत्रितरित्या 25 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. जी आता 800 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या श्रीमंताच्या यादीत क्रमांक एकवर आहेत अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी.
2008 सालानंतर इतक्या वर्षांनी गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत सर्वात टॉप स्थान पटकावलं. 2021 साली त्यांनी त्यांची संपत्ती तिप्पट केली आणि आता या वर्षी 150 अब्ज डॉलरसह ते सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत एक नंबरवर आहेत. भारतातील टॉप श्रीमंत तर काही कालावधीसाठी जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती. डॉलर आणि टक्केवारी दोन्ही बाबतीत ते सर्वात मोठे धनी ठरले आहेत.
पुढील 10 वर्षांत 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्यातील 70 टक्के ग्रीन एनर्जीमध्ये असेल, अशी घोषणा अदानी यांनी केली आहे.
तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत रिलायन्स इंड्रस्टीचे मुकेश अंबानी जे नेटवर्क 18 चे मालकही आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अंबानी यांची संपत्ती 5 टक्क्यांनी घटून 88 अब्ज डॉलरवर आली आहे आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
देशातील रिटेलिंग किंग राधाकिशन दमाणी जे सुपरमार्केटच्या DMart चेनचे मालक आहेत, त्यांची एकूण संपत्ती 6 टक्क्यांनी घसरून 27.6 अब्ज डॉलर झाली असली तरी त्यांनी श्रीमंतांच्या यादीच पहिल्यांदाच पहिल्या तीनमध्ये प्रवेश केला. तर कोविड-19 लशीमुळे बम्पर नफा झालेले लस उत्पादक सायरस पूनावाला 21.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत.
या वर्षी 9 नवीन चेहरे आहेत. ज्यात IPO मधील तिघांचा समावेश आहे. Nykaa ची फाल्गुनी नायर, गार्मेंट मेकर रवी मोदी आणि शूमेकर रफिक मलिक ही त्यापैकी तीन नावं. तसंच या यादीतील तिघांचं निधन झालं आहे. राहुल बजाज, राकेश झुनझुनवाला आणि पालोनजी मिस्त्री ही त्यांची नावं आहेत.