कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सिद्धनेर्ली आणि परीसरातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं. सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. सिद्धनेर्ली,बामणी ,शेंडूर ,शंकरवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला.सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस बराचवेळ सुरू होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
ऊसतोड मजुरांचे हाल
या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीसह शेतीच्या मशागतीच्या कामात व्यत्यय येणार आहे. मुसळधार पावसामुळे ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे या मजुरांचे हाल झाले. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे जनावरांसाठी ठेवलेली वैरण आणि सरपण पावसात भिजून नुकसान झाले आहे. तसेच काही काळ वीजपुरवठा देखील खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं याचा सर्वाधिक फटका हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतात पाणी साचल्यामुळे ऊस तोडणीचं काम बंद राहणार आहे. तसेच उसाची लागवड देखील लांबणीवर पडणार आहे. मात्र दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा व इतर पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे. या पावसाचा वाहतुकीला देखील मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पहायला मिळालं.