पीफ ठेवीवर खातेधारकांना
८.५ टक्के व्याज मिळणार
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) खातेधारकांना मिळणारे व्याज निश्चित करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. मंत्रालयाच्या मंजुरीनंतर पीफ ठेवीवर खातेधारकांना ८.५ टक्के व्याज दिले जाईल. याचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सहा कोटींहून अधिक खातेदारांना होणार आहे. गेल्या वेळी २०१९-२० या आर्थिक वर्षात, KYC गडबडीमुळे ग्राहकांना व्याज मिळविण्यासाठी ८ ते १० महिन्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती.
मंत्री नवाब मलिक चुकीची माहिती
देत आहेत : काशिफ खान
कॉर्टेलिया क्रूज आणि त्यावर झालेली पार्टी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी पार्टीचे आयोजक काशिफ खान समीर वानखेडेंचे मित्र असल्यामुळेच त्यांना अटक केली नसल्याचा दावा केला आहे. हे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत. यासंदर्भात काशिफ खान यांनी भूमिका मांडली आहे, ते म्हणाले, नवाब मलिक यांच्याकडे सर्व चुकीची माहिती आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. मी साधी सिगारेटही ओढत नसल्याचं लोकांना माहितीये. मला खात्री आहे की त्यांना ज्यांनी कुणी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे”, असं काशिफ खान म्हणाले आहेत.
G20 शिखर परिषदेसाठी
पंतप्रधान रोमला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच G20 शिखर परिषदेसाठी रोमला पोहोचणार आहेत. जवळपास १२ वर्षांनी भारतीय पंतप्रधान रोमला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी रोमला पोहोचतील. “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा इटलीची राजधानी रोमचा हा पहिलाच दौरा आहे, असं इटलीतील भारताच्या राजदूत नीना मल्होत्रा यांनी सांगितलं. रोमला पोहोचल्यानंतर काही तासांनी, मोदी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गांधी पुतळ्याला भेट देतील आणि नंतर साडेपाच वाजता इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेणार आहेत
पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या विरुद्ध देशद्रोहाचा कायदा : आदित्यनाथ
नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध मिळवलेला विजय साजरा करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोह कायदा लागू केला जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी सांगितले. भारतीय क्रिकेट संघाबाबत कथितरीत्या असभ्य शब्द वापरल्याबद्दल आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भारताच्या राज्यघटनेवर माझा
विश्वास : क्रांती रेडकर
क्रांती रेडकरनं आपल्या ट्वीटमध्ये कुणाचंही नाव न घेता अप्रत्यक्षपणे नवाब मलिक यांच्यावरच निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. “रोज माध्यमांवर केलेल्या कुणाच्यातरी निरर्थक विधानांवर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. माझ्याकडे इतरही अनेक कामं आहेत. आता इथून पुढे मी फक्त कायदेशीर पद्धतीनेच व्यक्त होईन. माझा फक्त भारताच्या राज्यघटनेवर विश्वास आहे”, असं ती म्हणाली.
अभिनेते पुनीत राजकुमार यांचे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन
कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुनीत यांना आज दुपारच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टेनिसपटू लिएंडर पेसचे
राजकारणात पदार्पण
प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात दाखल झाला आहे. आपल्या या नव्या इनिंगसाठी त्याने तृणमूल काँग्रेसची निवड केली आहे. गोव्यामध्ये आज तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्याचे पक्षात स्वागत केले.
मंत्री अनिल देशमुख यांना समन्स
रद्द करण्यास न्यायालयाचा नकार
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) गेल्या अनेक दिवसांपासून नोटीस बजावत आहेत. त्यांच्या निवासस्थानी छापेमारी देखील करण्यात आली. परंतु ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नव्हते. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख यांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने देशमुख यांना दिलासा नाकारत समन्स रद्द करण्यास नकार दिला. अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात जाण्याची सूचना दिली.
आर्यन खानला एक लाखाच्या
बाँडवर केले मुक्त
प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह (PR Bond) १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. आज आर्यन खानसह तिघेही तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे.
SD social media
9850 60 3590