कोवॅक्सिन लसीमध्ये गायीच्या
नवजात वासराच्या रक्तद्रवाचा वापर ?
काँग्रेस नेते गौरव पंधी यांनी कोवॅक्सिन लसीच्या बाबतीत एक धक्कादायक खुलासा केला. त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेली माहिती ट्विटरवर शेअऱ करत सांगितलं की, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीमध्ये गायीच्या नवजात वासराच्या रक्तद्रवाचा वापर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेली माहिती शेअर केली आहे. ही माहिती केंद्रीय औषध नियंत्रक मंडळाने विकास पटनी या व्यक्तीला दिलेली आहे. पटनी यांनीच माहिती मागवली होती.
पाकिस्तानच्या नॅशनल
असेंबलीमध्ये प्रचंड गोंधळ
पाकिस्तानमधील कनिष्ट सभागृह म्हणजेच नॅशनल असेंबलीमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. कनिष्ट सभागृहामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांचा मान सन्मान न करता थेट शिव्या देण्यास सुरुवात केली. संसदेच्या कनिष्ट सभागृहात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय आणि विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांना फाईल्स फेकून मारल्या. केवळ एकमेकांना शिव्या देऊन आणि आरडाओरड करुन समाधान झालं नाही म्हणून हे खासदार एकमेकांना मारण्याचाही प्रयत्न करत होते. पाकिस्तानी खासदारांनी एकमेकांना आया-बहिणींवरुन शिव्या दिल्याचंही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.
खोटं बोलण्यासाठी मोदींना
नोबेल मिळायला हवं
केरळच्या दोन मासेमारांना केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या प्रकरणावर सुरु असलेला खटला बंद करण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. खोटं बोलण्यासाठी मोदींना नोबेल मिळायला हवं, अशी टीका त्यांनी केली आहे.
रामकार्यात तंगडं घालाल
तर गाठ आमच्याशी आहे…
राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम..” असा इशारा अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे शिवसेनेला दिला आहे.
मोदींची प्रतिमा वाचविण्यासाठी
घेतला व्हायरसचा आधार : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदींची खोटी प्रतिमा वाचविण्यासाठी केंद्र सरकार सतत व्हायरसचा आधार घेत आहे आणि जनतेचा जीव घेत आहे. देशातील लसीकरण लवकर पुर्ण करावे लागेल. मोदी सरकारच्या असक्रियतेमुळे लशीची कमतरता लपविण्यासाठी भाजपाने रोज खोटं बोलने आणि पोकळ घोषणा देण्याने काही होणार नाही. देशाला त्वरित आणि संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे.”
बिहारमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या
अंतर्गत फक्त१९ करोना बाधितांवर उपचार
करोना प्रादुर्भावाच्या काळात देशातल्या आरोग्य यंत्रणांबद्दलची सत्य परिस्थिती समोर आली. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, औषधं यांच्या अभावाने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. आजतक, इंडिया टुडे यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत केवळ १९ करोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहेत.
जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेणी
सुरू करण्याचे आदेश
जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेणींसह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्याचे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील धार्मिकस्थळे बंद राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आली आहेत. लेणींसह दौलताबादचा किल्ला आणि बिबी का मकबरा, औरंगाबाद लेणी या पर्यटनस्थळांना आता भेटी देता येणार आहेत.
अदानी एन्टरप्राईजेसचे
शेअर्स २५ टक्क्यांनी घसरले
शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले. त्यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव घसरू लागले आणि ग्रुपच्या फ्लॅगशिप कंपनी अदानी एन्टरप्राईजेसचे शेअर्स २५ टक्क्यांनी घसरले, तर सर्व ग्रुप कंपन्यांच्या शेअर्सनी खालची पातळी गाठली.
शेकापचे माजी आमदार विवेकानंद
शंकर पाटील यांना अटक
कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना आज मुंबई ईडी झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशिल कुमार यांच्याकडे लेखी कैफियत मांडली होती. त्यानुसार अखेर आज अटक झाली.
गुजरातमध्ये भीषण अपघात
एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू
गुजरातमध्ये भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. आनंद जिल्ह्यातील तारापूर हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे. कुटुंब प्रवास करत असलेल्या कारची ट्रकला धडक होऊन हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कुटुंबातील १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नांदेडमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या
तीन दहशतवाद्यांना कारावास
एनआयए विशेष न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने 2012 मध्ये नांदेड येथून पाच जणांना अटक केली होती. नंतर हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ताब्यात घेतले. देशात अशांतता निर्माण करण्यासाठी नेते आणि पत्रकारांना ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी 2012 मध्ये अटक झालेल्या तीन जणांना विशेष एनआयए कोर्टाने शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी अन्य दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.
एसबीआयच्या डिजिटल सेवा
गुरुवारी दोन तासांसाठी बंद राहणार
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक इंडियाकडून (SBI) ग्राहकांसाठी एक महत्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगसह डिजिटल सेवा दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येतील. ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी बँकेकडून सिस्टीम अपग्रेडेशन सुरु आहे. उद्या दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत बँकिंगची सुविधा बंद राहील.
चिमुकल्या वेदिकाला मिळालं
16 कोटीचं इंजेक्शन
एसएमए (SMA) अर्थात ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप 1’ या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या 11 महिन्यांच्या गोंडस वेदिका शिंदे या चिमुकलीला 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन आज देण्यात आलं आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिलीय. भोसरीमधील सौरभ शिंदे यांना आपल्या 11 महिन्याच्या चिमुकलीला SMA या दुर्मिळ आजाराने ग्रासलं असल्याचं समजलं. त्यावरील उपचाराचा खर्च अफाट असल्याची जाणीवही त्यांना झाली. निधी उभारणीसाठी कॅम्पेनिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
SD social media
9850 60 3590