जन्म. १६ जून १९९४
आर्या आंबेकरची आजी वर्षां आंबेकर सुद्धा एक शास्त्रीय गायिका होत्या. पार्ले टिळक विद्यालयात संगीत शिक्षिका, आकाशवाणी गायिका, काही ऑडिओ कॅसेटच्या संगीतकार अशी त्यांची ओळख. आर्याचे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर आहेत ते उत्तम तबला वादक सुद्धा आहेत. आर्याची आई श्रुती आंबेकर यांनी जयपूर घराण्याचे खास शिक्षण प्रख्यात गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे अनेक वर्ष घेतले आहे. त्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयात संगीत विभागात लेक्चरर होत्या. त्या एम.ए. म्युझिक सुवर्णपदक, संगीत अलंकार देशात पहिली, बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, नेट उत्तीर्ण आहे. संगीत नाटकातही त्यांनी काम केले आहे. त्यांनी आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली. तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी अल्बम्स मध्ये तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली. आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती. सारेगमप या कार्यकमात तारसप्तकातला ‘नी’ फक्त एकमेव तिला मिळाला होता. आर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली. ‘पंचरत्न’, ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’, ‘जय हरी विठ्ठल’, ‘मराठी अभिमानगीत’, ‘आठवा स्वर’, ‘मला म्हनत्यात आर्या आंबेकर’, ‘गीत तुझे गाता गाता’, ‘खाऊचा गाव’, ‘माझ्या मातीचे गायन’, ‘दिवा लागू दे रे देवा’ हे आर्याच्या आवाजातील अल्बम संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. ‘आनंदवन आले घरी’ हा थोर समाजसेवक बाबा आमटेंचं कार्य वर्णन करणारा अल्बमही खूप चर्चेत राहिला.‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचं शीर्षक गीतही आर्यानेच गायलं आहे. आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आनंद मोडक, नरेंद्र भिडे या संगीतकारांकडे कॅसेट्स, चित्रपट, माहितीपट, नाटक इत्यादीसाठी ती गायली आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते. आर्या आंबेकरने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. लेटस गो बॅक, बालगंधर्व, रमा माधव तसेच आणखी काही चित्रपटांसाठी आर्याने पार्श्वगायन केले आहे. सुवासीनी, दिल दोस्ती दुनियादारी, तुला पाहते रे, जिवलगा या मालिकांसाठी आर्याने गाणी गायली आहेत. माणिक वर्मा शिष्यवृत्ती, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार, मोस्ट नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इअर, सूर ज्योत्सना राष्ट्रीय संगीत अशा मानाच्या पुरस्काराने आर्याला सन्मानित करण्यात आले आहे.२०१७ मध्ये ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात मुख्य भूमिका करून आर्या आंबेकर अभिनेत्री म्हणून चित्रपट प्रवेश केला आहे.
संजीव वेलणकर, पुणे