मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याबाबत आता एक मोठा निर्णय समोर आला आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर ओकवरील बैठक संपली आहे. ही बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात नवाब मलिकांच्या राजीनामा घेवू नये अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार राखी जाधव यांच्याकडे देण्यात येणार आहे.
तसेच नवाब मलिक यांच्याकडे जी पालकमंत्रीपद आहेत तीही काढून घेण्यात येणार आहे. नवाब मलिक सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री मलिकांबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. नवाब मलिकांच्या खात्याची जबाबदारी कुणाकडे देणार हे राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्रीकडे ठेवणार आहे. कारण सध्या डिपार्टमेन्टचं काम पूर्णपणे ठप्प झालंय, त्यामुळे ते कारण जबाबदारी इतर मंत्र्यांना देण्यात येणार असा निर्णय झाला आहे. मलिक दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री राहिलेले आहेत. डिस्ट्रिट डेव्हलमेन्ट प्लानप्रमाणे काम होणं आवश्यक आहे, त्यामुळे ही जबाबदारी इतरांनी द्यावी असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच अनिल देशमुखांना चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलंय. मलिकांची अटक चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे अशी आमची धारणा आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच
मलिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र तो मिळाला नाही, म्हणूनच 31 मार्च हे फायनान्शियल इयर एन्ड असल्यामुळे पर्यायी जबाबदारी देण्याचा आमचा विचार आहे. असेही त्यांनी सांगितले. तसेच फडणवीसांनी जो पेनड्राईव्ह दाखवून आरोप केले त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. पेनड्राईव्हचा खरेखोटेपणा आहे. असे अनेक पेनड्राईव्ह निघू शकतात, त्याची सत्यता पडताळणी केली पाहिजे, त्या आधीच आपण सगळे बोलत आहोत. असे पेनड्राईव्ह आणि खासगी चर्चा रेकॉर्ड व्हायला लागल्या, तर काम करणं अवघड होईल, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच 2024 पर्यंत आमचं सरकार राहणार आहे, हे त्यांनी पहिल्यांदा मान्य केलंय. महाविकास आघाडी तर्फे त्यांचे आभार मानतो, असा टोलाही जयंत पाटलांनी फडणवीसांना लगावला आहे.