भुसावळ खाद्यभ्रमंती : 7
भुसावळच्या खाण्याला अजुन एक अंग आहे, ते म्हणजे तिथल्या लग्नातील जेवणावळी किंवा पंगती. आजकाल ज्याला आपण लग्नाच जेवण म्हणतो तो फक्त उपचार आहे..भल्या थोरल्या लाँन्स, हाँटेल्स मंगल कार्यालय तिथे उभारलेले विविध स्टाँल्स, त्यापुढे हातात डिश घेवुन उभे असलेले बापुडवाणे ध्यान म्हणजे आपणच असतो ते..कुणी कुणाला आग्रह करतोय, कुणी जिलबीचा घास भरवतोय हि बातच सोडा..अश्या लग्नांमध्ये जेवल काय अन् न जेवल काय सारखच.. ..आता भुसावळलासुध्दा लाँन्स,कार्यालये झाली आहेत, पण 80-90 च्या दशकात मोजकीच मंगल कार्यालये होती. यात माहेश्वरी भवन ,पंचायत वाडा ,चोथमल धनजी धर्मशाळा,ब्राह्मण संघ ,रंगभुवन हे आघाडीवर होते. जो तो आपल्या बकुबानुसार,समाजानुसार कार्यालयाची निवड करायचा, पण खरी मजा यायची ती गल्लीत किंवा वाँर्डात.. घरासमोरच मांडव घालुन केलेल्या लग्नात.
बर.. लग्नाच्या तारखा ह्या एप्रिल, मे मधल्या..टळटळीत उने.त्यात नवरदेव थ्री पीस घालुन घोड्यावर बसलेला..(तोंडात एका बाजुला पान व डोळ्यावर गाँगल मस्ट) समोर त्याचेच मित्र बेभान होवुन नाचायला..बेभान याला अनेक कंगोरे आहेत, जाणकारांना सांगणे नलगे..चांगली दोन-तीन तास ती वरात चालायची (कि घुमायची ?) मग वरातीमधले चार दोन कर्ती माणस,नाचणा-या महाभागांना विनंती करायचे (एरवी त्यांनी ह्या हिरोंची कानफड फोडली असती पण लग्नात हे हिरो शेर असायचे) ” चाला रे भो.. अरे टाळी लाग्याले फक्त पाच मिनीट राह्यले बर..नंतर लागल तितक नाचा’ ..अस करत करत ती वरात मांडवात यायची..मांडवात शिरायच्या आधी भांगडा व्हायचा ” ये देश है वीर जवानो का! वगैरे वगैरे..हे गाण लग्नात का वाजवतात हे मला अजुन कळलेल नाही. मग नवरा यथासांग मांडवात यायचा ,परत एक बँडवाला ,क्लोरेनेट घेवुन वर वधुच्या पुढे ‘ बहारो फुल बरसावो ,मेरा महेबुब आया है ..हे वाजवत निघायचा..वर वधु स्टेजवर गेले कि तरुण मंडळी आपआपले अँगल सेट करुन जागा पटकवायचे..मांडवात एका पिपांत थंडगार पेयात बर्फ घातलेला असायचा ,प्लास्टिकच्या ग्लासात त्याचे वाटप सुरु व्हायचे..सोबतीला अक्षतां वाटल्या जायच्या ..एक एक मंगलाष्टागणीक ह्या अक्षता वर-वधुच्या दिशेने भिरकावल्या जायच्या ( काही जणांचा नेम दुसरीकडे असायचा ,त्याचसाठी ते अँगल धरायचे ) लग्न लागल, कि अक्षरश: वर आणि वधुच्या पायांजवळुन मंडळी जेवायला बसायची,आधी वराकडले नंतर बाकीचे वगैरे लाड नसायचे..रुमाल टाकुन जागा पटकावल्या जायच्या,एखादी रिकामी जागा हेरुन जर कोणी बसायचा प्रयत्न केला तर त्याला सुनावले जायचे ” ललित येनारे आढी,त्याची जागा हे.. यजमान श्रीमंत असो वा गरीब लग्नाचा मेन्यु हा ठरलेला.. गव्हाच्या जाडसर पिठाच्या बट्टया, घरच्याच गावरान दाळीचे पिवळेधम्मक वरण..हिरव्या पिवळ्या मिरचीची वांग्याची भाजी..गोड हव म्हणुन बुंदी..मोजकेच पदार्थ पण जिभेला वेड लावणारे..हे सर्व केळीच्या पानावर वाढल जायच.या लग्नांची अजुन खासियत म्हणजे ,लग्नपत्रिकेवर शिक्का मारलेला असायचा ” चुलीस निवते ” म्हणजे त्यादिवशी चुल बंद ..तिला त्यादिवशी विश्रांती ,म्हणजे या लग्नाचे आमंत्रण हे घरातील सर्वांना आहे कुणीही घरी जेवु नये..मग काय ,पंगतीला किमान 700-800 लोक ..पण प्रत्येकी पंगत ही 10 मिनीटात आटपायची.यासाठी मात्र सराव आवश्यक..खरपुस तळलेल्या बट्टया दोन्ही हातांनी चुरायच्या ,त्याच आळ करायच ,त्यात वरण..तोंडी लावायला ही भाजी..तुपाचा आग्रह फार..वाढायला गल्लीतलीच मुल..त्यांना सांगाव वागत नव्हत ,ते आठवडाभर लग्नघरी राबत असायचे.पण एकदा तुम्ही आळ मोडल कि हि मुल तुमच्याकडेे फिरकायची नाहीत कारण आळ मोडल म्हणजे तुमच जेवण झाल असा त्याचा अर्थ….पण कोणी जर हा मेन्यु बदलुन वेगळ काहीतरी केल तर त्याची भर मांडवात विचारपुस व्हायची..” जेवन हे बी चांगल हे..पन आपली भाजी असती त , गह्यरी मजा आली असती..जाउ दे..तुह्या मयात( मळ्यात ) जाउ कधीबी..बोलावजो परत..संध्याकाळ व्हायची, मुलीच्या पाठवणीला सुरुवात व्हायची..आयाबायांचे हुंदके सुरु असायचे..बापाला ती सवलत नसायची ,तो बिचारा वरवर घाई करायचा..चला आटपा बर आता, जाऊ द्या तिले ,अंधार पडीन मंग..अस आवंढा गिळत सांगायचा..सकाळी घातलेली कडक कांजीची टोपी आता गळुन पडलेली असायची..असा निरोपाचे हात जोडलेला बाप कुणालाच पाहावला जायचा नाही..आता भेटुयात ब्राह्मण संघात..तिथल्या पंगतीत ..पुढल्या भागात..तोपर्यंत एखादे असे लग्न जवळपास आहे का हेरुन ठेवा व नक्की पंगतीचा लाभ घ्या..(सध्या कोरोनामुळे ते जरा अवघडच आहे )
©सारंग जाधव.