बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर 22 मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेवर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावर कहर म्हणजे रुग्णवाहिकाच नसल्याने मृतदेहांना एकावर एक टाकून स्मशानभूमीत न्यावे लागत असल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे.
रुग्णालयात केवळ दोनच रुग्णवाहिका आहेत. कोरोनाचं वाढतं संकट पाहता पाच अतिरिक्त रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. 17 मार्च 2021 रोजी जिल्हा प्रशासनाला चिठ्ठी लिहून अतिरिक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अजून कोणताही रुग्णवाहिका मिळालेली नाही, असं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. रुग्णावाहिका नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असून स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. बीडमधील रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. अंबाजोगाई तालुक्यात तर स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे रामानंद तिर्थ रुग्णालयावर मोठा ताण आला आहे. शेजारील तालुक्यातील रुग्णही स्वारातील रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत. रुग्णांच्या संख्येप्रमाणेच मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे