खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील क्रायो गॅस कंपनीतून तयार होणारे ऑक्सिजन सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरवले जात आहे. लोटे परिसरातील तिघा तरुणांनी सुरू केलेला हा प्रकल्प अवघ्या जिल्ह्यासाठी प्राणवायू ठरला आहे.
औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांत ब्लास्ट फर्नेस म्हणजे भट्टी चालविण्यासाठी ऑक्सिजन वापरले जाते. कारखान्यांची ही गरज ओळखून लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील आवाशी गावातील सतीश आंब्रे, शेल्डी येथील सचिन आंब्रे आणि लो गावातील सचिन चाळके या तिघा तरुणांनी जानेवारी 2020 मध्ये लोटे औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन निर्मितीचा क्रायो गॅस हा प्रकल्प उभारला. हे तिघे तरुण पूर्वी लोटे येथीलच एका कंपनीत कामाला होते. कारखान्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी संधी शोधली व कंपनीतील नोकरीचा राजीनामा देऊन स्वतः उद्योजक बनले. बँकेचे कर्ज आणि स्वतःजवळील साठवलेली पुंजी यांच्या गुंतवणुकीचे नियोजन करून तीन कोटी रुपयांचा गॅस निर्मितीचा प्रकल्प त्यांनी लोटे औद्योगिक वसाहत परिसरात सुरू केला.
लोटे येथील कारखानदार आणि जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना ते ऑक्सिजनचा पुरवठा करत होते. त्यांच्या प्रकल्पातून शासकीय रुग्णालयांना कमी प्रमाणात ऑक्सिजन लागत होता. त्यामुळे करखान्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर या कंपनीचा भर होता. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन कमी पडू लागली. त्या नंतर या कंपनीने शासन निर्देशांनुसार उद्योगांना ऑक्सिजन पुरवण्याचे बंद केले. दिवसा दहा टन ऑक्सिजन तयार करून त्याचा पुरवठा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्राण वाचविण्यासाठी सुरू झाला.
ऑक्सिजन तयार करण्यासाठी लागणारे लिक्विड पूर्वीच्या कंपनीने बंद केल्यामुळे मध्यंतरी या कंपनीतून फार कमी प्रमाणात ऑक्सिजनचे उत्पादन होत होते. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिंदल कंपनीकडून लिक्वीड उपलब्ध करून दिले. त्यामुळे क्रायो गॅस कंपनीतून आता दिवसाला 8 ते 10 ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जात आहे.