कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना काल संपन्न झाला. या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला झाला. हा अंतिम सामना जोरदार आणि रोमांचक असेल यात दुमत नाही. कारण या सामन्यात किलियन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू यांनी रंगतदार खेळ केला. लिओनेल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात गेली २० वर्ष अथक परिश्रम करत होता अखेर ते पूर्ण झाले. मेस्सी की एमबाप्पे हा सामना रंगेल असे वाटलेले, पण वातावरण पहिल्या सेकंदापासून ते रेफरीची अखेरची शीटी वाजेपर्यंत मेस्सीमय राहिले आणि पुढील अनेक वर्ष ते तसेच राहिल याची काळजी मेस्सीने आजच्या खेळातून घेतली. २०१४ला विश्वचषक विजयाचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला. लिओनेल मेस्सीचा अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीसतोड खेळ झाला अन् कायलिन एमबाप्पे एकटा भिडला. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.
विजेतेपदाचे दावेदार म्हणून या सामन्यात उतरलेल्या फ्रान्सवर दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या वीस मिनिटात फ्रान्स संघ केवळ एकदाच अर्जेंटिनाच्या क्षेत्रात धडक देऊ शकला. २०व्या मिनिटाला फ्रान्सच्या बचावपटूने केलेल्या धसमुसळ्या खेळाचा फायदा उठवत मेस्सीने मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावत संघाला आघाडीवर नेले. पहिल्या गोलचा जल्लोष चाहते करत असतानाच मेसीने आणखी एक आक्रमण रचले. डाव्या बगलेतून त्याने रचलेल्या आक्रमणाला ऍंजेल डी मारिया याने गोलच्या स्वरूपात बदलले. ३६व्या मिनिटाला झालेल्या या गोलमुळे अर्जेंटिना संघ सामन्यात पुढे गेला. संघ पिछाडीवर पडलेला असताना, फ्रान्सच्या प्रशिक्षकांना ४०व्या मिनिटालाच आपल्या संघात बदल करावे लागले. संपूर्ण स्पर्धेत चांगले कामगिरी केलेले जिरू व थुरम यांना प्रशिक्षक डीडीअर डेश्चॅप यांनी बाहेर घेतले. अतिरिक्त मिळालेल्या सात मिनिटात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला.
दुसऱ्या हाफमध्ये मात्र फ्रान्सचा संघ अतिशय आक्रमक पद्धतीने खेळताना दिसला. सामना एक वेळ अर्जेंटिनाच्या बाजूने गेला आहे असे वाटत असताना स्पर्धेत पाच गोलल झळकावलेला किलीयन एम्बाप्पे फ्रान्सच्या मदतीला धावला. ८०व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी त्यांनी गोलमध्ये ढकलत पिछाडी भरून काढली. पुढच्याच मिनिटाला त्याने आणखी एक सुरेख गोल करत फ्रान्सला सामन्यात बरोबरी करून दिली. अखेरच्या दहा मिनिटात फ्रान्सच्या संघाने गोल करण्याचे आणखी दोन प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न सफल झाले नाहीत.
निर्धारित ९० मिनिटांनंतर स्कोअर २-२ असा बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. तेथे दोन्ही संघांना प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे दोन हाफ मिळाले. लिओनेल मेस्सीने १०८व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला सामन्यात ३-२अशी आघाडी मिळवून दिली. पुन्हा एकदा अर्जेंटिना विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत होते, परंतु Kylian Mbappé पुन्हा त्यांच्या मार्गात उभा राहिला. त्याने ११७व्या मिनिटाला गोल करून सामना ३-३ असा बरोबरीत आणला. यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. तिथे अर्जेंटिनाने हा सामना ४-२ असा जिंकला.
अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोघांच्या नजरा तिसऱ्या विजेतेपदावर होत्या. पण त्यात अर्जेंटिनाने बाजी मारत १९७८ आणि १९८६ नंतर तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकवर नाव कोरले. फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. नुकत्याच झालेल्या सात विश्वचषक आवृत्त्यांमध्ये फ्रान्सने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र ते आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकले नाही. २००६ मध्ये त्यांचा इटलीकडून पराभव झाला होता आणि आता २०२२ साली अर्जेंटिनाने त्यांचा पराभव केला. दुसरीकडे, अर्जेंटिनाने शेवटचा २०१४ मध्ये विश्वचषक फायनल खेळला होता, जिथे त्यांचा जर्मनीविरुद्ध पराभव झाला होता. यासह अर्जेंटिना ३५० कोटींचा मालक ठरला.