मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात, 1 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने एका खाजगी बसला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या मागील भागाचा चुराडा झाला आहे. तर कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे. बस मध्ये एकूण 35 प्रवासी होते. या अपघातात बसचा चालकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 प्रवासी अत्यवस्थ तर एक गंभीर जखमी आहे. जखमींना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे. 10 ते 12 किरकोळ जखमींना घटनास्थळावर प्राथमिक उपचार केले जात आहेत.
कतार Football World Cup 2022 मधून FIFA ची किती कमाई?
अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात रविवारी (18 डिसेंबर) रोजी रोमहर्षक फुटबॉल मॅचनंतर ‘कतार फिफा वर्ल्ड कप 2022’ स्पर्धेची सांगता झाली. लिओनेल मेस्सीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर फायलन मॅचमध्ये अर्जेंटिनाने विजय मिळवला. तर, फ्रान्सच्या किलियन एम्बापेनंही आपल्या खेळाच्या बळावर चाहत्यांची वाहवा मिळवली. अनेक वर्षांची पूर्वतयारी आणि गुंतवणूक आवश्यक असलेल्या या स्पर्धेनं ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल’ला (फिफा) व्यावसायिक सौद्यांमधून सुमारे 7.5 अब्ज डॉलर्स मिळवून दिले. ही रक्कम 2018 मधील रशिया वर्ल्ड कपमध्ये झालेल्या कमाईपेक्षा 1 अब्ज डॉलर्सनं जास्त आहे.
रविवारी झालेल्या फायनल मॅचमध्ये अतिरिक्त वेळेनंतर दोन्ही टीमचा स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. त्यामुळे मॅच पेनल्टी शूटआउटमध्ये गेली होती. तिथे एमिलियानो मार्टिनेझनं चांगला खेळ करून किंग्सले कोमनचा शॉट वाचवला. तर, ऑरेलियन चौआमेनीनं गोल न केल्यामुळे अर्जेंटिनानं फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला.
मेस्सी 2022 चा वर्ल्ड कप जिंकेल; तारखेसह केलेली भविष्यवाणी ठरली खरी
अखेर लियोनेल मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं, अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप 2022 जिंकला. फ्रान्सचा 4-2 अशा फरकाने पराभव करत वर्ल्ड कपवर अर्जेंटिनाने नाव कोरलं. स्पर्धेच्या सुरुवातीला अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे अर्जेंटिना सेमीफायनल खेळू शकेल का अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र रोमहर्षक अशा अंतिम सामन्यात मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने जगज्जेतेपद पटकावलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर आता सोशल मीडियावर एक ट्विट व्हायरल होत आहे.
मेस्सी वयाच्या 34 व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकेल असं तारखेसह ट्विट एका युजरने 2015 मध्ये केलं होतं. अर्जेंटिनाने सामना जिंकल्यानंतर हे ट्विट व्हायरल होत आहे. यात ट्विटर युजरने दावा केला होता की, 2022 मध्ये कतारमध्ये 18 डिसेंबरला लियोनेल मेस्सी वयाच्या 34 व्या वर्षी पहिला वर्ल्ड कप जिंकेल. तसंच 7 वर्षांनी माझ्याशी बोला असंही ट्विटमध्ये युजरने म्हटलं होतं. आता ही भविष्यवाणी खरी झाल्याचं म्हणत अनेक युजर्नसी ट्विट शेअर केलं आहे.
ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत एलॉन मस्कचं मोठं ट्वीट
टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलाॕन मस्क यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर वापरकर्त्यांनाच आपल्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देईल त्याप्रमाणे आपण करू असं म्हटलंय. त्यांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
एलॉन मस्क म्हणाले, “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावं का? मी या ट्विटर पोलच्या निकालाला बांधील असेन.”
गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय !
गायरान जमिनीवर अतिक्रमण काढण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. या आदेशानंतर अतिक्रमण काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, नोटीस मिळल्यानंतर अनेक लोक बेघर होतील, त्यामुळे सरकारने यावर निर्णय घेण्याची विनंती राज्यभरातून करण्यात आली होती. या प्रकरणात आता आणखी एक दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारतर्फे बजावण्यात आलेल्या नोटिसींवर मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली स्थगिती 24 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमणं पाडकामाच्या नोटिसांबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या सरकारी अधिकारी नागपूर अधिवेशनात व्यस्त असल्याची माहिती राज्य महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. गायरान जमिनीवरील बांधकाम संदर्भात राज्य सरकारनं पाठविलेल्या नोटिस विरोधात शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील केसूर्डी गावच्या 200 शेतकरी कुटुंबि्यांनी न्यायालयाला पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राची गंभीर दखल घेत न्यायालयानं या संदर्भात सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस जी चपळगावकर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
जनता उपाशी मरते, दुसरीकडे…, पठाणमधील कपड्यांच्या चर्चेवर रत्ना शाह भडकल्या
अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. 12 डिसेंबर रोजी या चित्रपटातील पहिलं गाणं, ‘बेशरम रंग’ रिलीज करण्यात आलं. चाहत्यांना हे गाणं आवडलं आहे. मात्र, या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या वेशभूषेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह काही भाजप नेत्यांनी या गाण्यावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी आपलं मत मांडलं आहे. “सध्याच्या सामाजिक-राजकीय वातावरणात हिंदी चित्रपटसृष्टीला नेहमीच द्वेषाचा सामना करावा लागतो. देशातील अनेक नागरिकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. त्या विषयी बोलण्याऐवजी आपल्याकडे कपड्यांबद्दल चर्चा होते हे, दुर्दैव आहे. भविष्यात ही स्थिती बदलेल अशी मला आशा आहे,” असं रत्ना शाह म्हणाल्या आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मोबाईलचोरीचा आरोप असलेल्या तरुणाला धावत्या रेल्वेतून फेकलं
रेल्वे प्रवासातील एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. . दिल्लीला जाणाऱ्या ‘14205’ अयोध्या कॅंट ओल्ड दिल्ली एक्स्प्रेसमध्ये मोबाईल फोन चोरीचा प्रकार घडला. मोबाईल चोरल्याचा आरोप असलेल्या 20 वर्षांच्या एका तरुणाला शुक्रवारी रात्री बेदम मारहाण करून चालत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आलं. शहाजहानपूर येथील तिल्हार रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड लाइनच्या खांबाला डोकं आदळल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भात वृत्त दिलंय.
या धक्कादायक घटनेच्या एका दिवसानंतर, पोलिसांनी त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने रेकॉर्ड केलेला 66 सेकंदांचा व्हिडिओ जप्त केला आहे. यामध्ये ट्रेनमधील अनेक लोक हसताना आणि त्या तरुणावर हल्ला करताना दिसत होते. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये असं दिसतंय की तो तरुण माफी मागून सोडून देण्यासाठी विनवण्या करत असतानाही नरेंद्र दुबे नावाचा एक प्रवासी त्याला शिवीगाळ करत आणि जनरल डब्याबाहेर ढकलत आहे.
नागपुरात येताच उद्धव ठाकरे ऍक्शनमध्ये, महाविकासआघाडीची बैठक रद्द, पण आमदारांना तातडीचे आदेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. हॉटेल रेडिसनमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्याच्या दृष्टीने या बैठकीत तयारी होणार आहे.
दरम्यान महाविकासआघाडीची आज चार वाजता होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. आजच्याऐवजी ही बैठक आता उद्या सकाळी 9 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. महाविकासआघाडीच्या या बैठकीआधी उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाची रणनीती ठरवणार आहेत.
आमदार आई बाळासह अधिवेशनाला, मुख्यमंत्र्यांनी दालनात बोलावून केलं कौतुक
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधक आमदार एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पण, गराड्यात एक वेगळं चित्र पाहण्यास मिळालं. आपल्या अडीच महिन्याच्या लेकीसह राष्ट्रवादीच्या आमदार विधानभवनात दाखल झाल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासह आमदार आईला बोलावून घेतलं आणि कौतुक केलं.
आमदार सरोज अहिरे यांनी आज त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधानभवनात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. तसेच त्यांच्या या कृतीचे जाहीर कौतुक केले.
SD Social Media
9850 60 3590