राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. आधीच्या डेल्टा व्हेरियंटसोबत नवा ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron Varient) वेगानं पसरतोय. अर्थातच, लहान मुलंही या ओमायक्रॉनच्या विळख्यात सापडली आहेत. मात्र मुलांमध्ये मोठ्या माणसांपेक्षा वेगळी लक्षणं दिसून येत असल्याचं समजतंय.
दक्षिण आफ्रिकेतील डिस्कवरी हेल्थनं मुलांमधील ओमायक्रॉन संसर्गाचा अभ्यास केलाय. त्यानुसार मुलांना नाक बंद होणं, घसा खवखवणं, कोरडा खोकला आणि पाठीचा खालचा भाग दुखणं ही सामान्य लक्षणं दिसून आली आहेत.
अमेरिकेतील लेविन चिल्ड्रन हॉस्पिटलमधील तज्ज्ञांच्या मते लहान मुलांच्या तुलनेत प्रौढांमध्ये घसा खवखवणं आणि कफ ही लक्षणं अधिक प्रमाणात दिसतात. काही वेळा मुलांना डांग्या खोकला होत असल्याचंही आढळलंय. यात श्वास घेताना घुरघुरण्यासारखा आवाज येतो.
काही मुलांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम किंवा MIS-Cचा त्रास दिसून आलाय. यात हृदय, फुफ्फुसं, रक्तवाहिन्या, यकृत, कपाळ, त्वचा किंवा डोळ्यांत सूज येऊ शकते. त्यामुळे मुलांमधील लक्षणं सौम्य असली तरी त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आले आहेत.
अमेरिकेत 5 वर्षांखालील मुलं रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. भारतात अद्याप 15 वर्षांखालील मुलांचं लसीकरण सुरू झालेलं नाही. मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांपेक्षा अधिक असली, तरी ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग पाहता अनेक मुलं त्याच्या कचाट्यात सापडतायत. अशा वेळी पालकांनी सावध राहून मुलांवर वेळीच उपचार करणं आवश्यक आहे.