बीसीसीआयच्या नव्या सेंट्रल काँट्रॅक्टच्या अंतिम यादीतून भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. २१ डिसेंबरला बीसीसीआयची वरिष्ठ परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत सेंट्रल काँट्रॅक्टबाबत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांना सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये प्रमोशन मिळू शकतं.
सध्या हार्दिक पांड्याची टी२० संघाचा भविष्यातला कर्णधार म्हणून चर्चा आहे. त्याला ग्रुप सीमधून ग्रुप बीमध्ये प्रमोट केलं जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या बैठकीत १२ मुद्दे असतील. भारतीय संघाची टी२० वर्ल्ड कप आणि बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील कामगिरीचा आढावा यात नसेल. पण जर अध्यक्षांना आवश्यकता वाटली तर इतर काही मुद्दे ऐनवेळी चर्चेत घेतले जाऊ शकतात.
बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा हा वरिष्ठ पुरुष आणि महिला संघांच्या रिटेनरशिप करारावर चर्चा कऱणं हा आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून माजी उप कर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हे सध्या बाहेरच आहेत. त्यामुळे ते सेंट्रल काँट्रॅक्टमधूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे. यष्टीरक्षक ऋद्धिमान साहालासुद्धा वगळलं जाऊ शकतं. कारण त्याला वर्षाच्या सुरुवातीलाच सांगण्यात आलं होतं की, त्याची पुन्हा भारतीय संघात निवड होणार नाही.
बीसीसीआय चार वर्गात खेळाडूंना सेंट्रल काँट्रॅक्ट देतं. यात ए प्लसमध्ये वर्षाला सात कोटी रुपये, ग्रुप ए मध्ये पाच कोटी रुपये, ग्रुप बीमध्ये तीन कोटी रुपये, तर सी ग्रुपमध्ये वर्षाला एक कोटी रुपये खेळाडुला दिले जातात. बीसीसीआय खेळाडुंना आंतरराष्ट्रीय कामगिरीशिवाय इतर निकषांच्या आधारे या करारात समाविष्ट करते. राष्ट्रीय निवड समितीशी चर्चाही केली जाते. ए प्लस आणि ए अशी कॅटेगरी आहे जिथे सर्व प्रकारात नियमित खेळणारे किंवा किमान कसोटी संघात ज्यांचे स्थान पक्के असेल अशा खेळाडुंचा समावेश असतो. तसंच प्रमोशन हे खेळाडुंच्या कामगिरीवर आधारीत असतं, यात आयसीसी रँकिंगचासुद्धा विचार केला जातो.