मुंब्र्याच्या कौसा परिसरातील प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर दुर्घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना अनपेक्षित विरोधाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक शानु पठाण किरीट सोमय्या यांना बघताच आक्रमक झाले. त्यामुळे प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसला.
एखादी दुर्घटना घडल्यानंतर राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे ही काही नवीन बाब नाही. त्यानुसार किरीट सोमय्याही बुधवारी सकाळी प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयात पोहोचले. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानु पठाण यांनी ‘किरीट सोमय्या वापस जावो’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पोलिसांनी शानु पठाण यांना अडवले.
आम्ही लोकांना वाचवण्याचे काम करत आहोत. भाजपच्या नेत्यांनी राजकारण करु नये, असे शानु पठाण यांनी किरीट सोमय्यांना सुनावले. त्यानंतर किरीट सोमय्या काहीवेळातच पाहणी करुन घटनास्थळावरून निघून गेले.