कोल्हापुरात पंचगंगा नदीने रात्री धोक्याची पातळी ओलांडली, रहिवाशांचे स्थलांतर

कोल्हापुरात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीने रात्री धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फूट एक इंचांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 110 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदीची इशारा पातळी 39, तर धोका पातळी 43 फूट आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोल्हापुरात पावसाचा वेग कायम राहिल्यास पुन्हा एकदा हाहाःकार उडण्याची भीती आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना शक्य असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केलंय.

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात पावसाचा हाहाःकार पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे कोवाड बाजार पेठेत पाणी शिरलं असून व्यापारी चिंतेत आहेत. जांबरे धरणातून 3 हजार 115 क्युसेक, तर घटप्रभा धरणातून 15616 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही अचानकपणे वाढ झाल्याचं दिसत आहे. गुरुवारी रात्री 11 वाजता पाणीपातळी 30 फुटांवर गेली. सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरल्यामुळे 15 घरांमधील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले.
त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.