जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या चार दिवसांत थोडी उसंत दिली होती.परंतु कालपासून पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान पुणे, मुंबई या मुख्यशहरांमध्ये पावसाला पुन्हा सुरूवात होणार आहे.
राज्याच्या काही भागात पावसाने उसंत दिल्याने काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले होते. यामुळे काही अंशी तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला होता. दरम्यान कालपासून पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, उत्तर कोकणातील पालघरसह नाशिक, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर पूर्व विदर्भासह, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता होती.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने त्याचा फारसा प्रभाव पडणार नसल्याचे दिसून येते. राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा दोन ते तीन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाची शक्यता आहे.
दरम्यान मागच्या 24 तसांत कोकण : पोलादपूर, माथेरान, कुडाळ, सुधागडपाली या भागात 30 मिमी पावसाची नोंद झाली. तर मुरुड, तळा, राजापूर, जव्हार, पेण, संगमेश्वर, महाड, खालापूर, माणगाव, शहापूर, मोखेडे मूलदे या भागात प्रत्येकी 20 मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळा, महाबळेश्वर 50, इगतपुरी, राधानगरी, गगनबावडा प्रत्येकी 30 मिमी पावसाची नोंद झाली.
मराठवाडा परिसरात 20 मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, लाखंदूर, सालकेसा, सिरोंचा या भागात प्रत्येकी 20 मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथा दावडी 60, डुंगरवाडी, खोपोली, ताम्हिणी प्रत्येकी 50. शिरगाव, वळवण प्रत्येकी 40, कोयना (पोफळी), कोयना (नवजा), भिरा प्रत्येकी 30 मिमी पावसाची नोंद झाली.