राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर 38 दिवसानंतर होत आहे. मंत्रिमंडळामध्ये कुणा-कुणाला संधी मिळणार याची चर्चा रंगली आहे. पण, शिंदे गटातील 12 आमदार नाराज असून ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर भाजपसोबत घरोबा करून सरकार स्थापन केलं. अखेर आज महिना उलटल्यानंतर अखेरीस विस्ताराचा निर्णय घेतला आहे. पण, हे एकनाथ शिंदे यांचे हे मंत्रिमंडळ केवळ औट घटकेचं आहे, अनेक जण मंत्रिमंडळात इच्छुक आहे, त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा राऊत यांनी केला.
आपल्याला मंत्रिमंडळात जागा मिळावी यासाठी अब्दुल सत्तार आणि इतर आमदार जोरदार प्रयत्न करत आहे. त्यांना जर मंत्रिपद मिळाले नाहीतर ते शिंदे गटात गोंधळ घालतील. शिंदेंच्या गटात एकूण 12 आमदार हे अस्वस्थ आहेत, ते सर्वजण आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.
तर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतरचं हे पहिलंच मोठं अधिवेशन असणार आहे, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार हे मात्र निश्चित आहे.