सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. पूनावाला यांनी कोणतीही सुरक्षा मागितलेली नसताना त्यांना केंद्राने सुरक्षा दिली. त्यामागे काय दडलं आहे? असा सवाल करतानाच केंद्राने पुरवलेले सुरक्षा रक्षक अदर पूनावाला यांची रेकी करत आहेत काय?, असा गंभीर सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले. अदर पूनावाला यांनी आधी भारतात जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. त्यांना कुणी धमकी दिली हे केंद्र सरकारने सांगावं. पूनावाला यांनी कुणालाही सुरक्षा मागितली नाही. तरीही त्यांना सुरक्षा का पुरवण्यात आली. या सुरक्षेच्या मागे दडलंय काय? हे केंद्र सरकारने जाहीर करावं, अशी मागणी त्यांनी केली.
पूनावाला यांना केंद्र सरकारने न मागताच सुरक्षा पुरवली आहे. केंद्राचे सुरक्षा रक्षक त्यांची रेकी करत आहेत काय?, असा सवालही त्यांनी केला. तसेच व्हॅक्सिनचे केंद्राने दोन दर ठरवले. यामागे टक्केवारीचं राजकारण काय आहे? असा सवालही त्यांनी केला. केंद्र सरकार लसीकरणात अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, पूनावाला यांना देशात कोणीही हात लावणार नाही. त्यांनी देशासाठी आणि देशाच्या जनतेला वाचवण्यासाठी व्हॅक्सिनेशनचं काम भारतात करावं, असं सांगातनाच पूनावाला यांच्यासोबत काँग्रेस असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल, असंही त्यांनी सांगितलं.
अदर पूनावाला यांनी आंतरराष्ट्रीय मॅगेझीन टाईम्सला एक मुलाखत दिली आहे. त्यांनी यामध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत. “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे,” असं अदर पूनावाला यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे.