भाज्या- डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ

मुंबई, ठाणे, कोकणासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचे सर्व भाग महागाईच्या वणव्यात होरपळले आहेत. भाज्या, फळे, डाळी आणि दुधाचे दर वधारल्याने सामान्यांच्या घरखर्चात वाढ झाली आहे. मालवाहतूकदारांनी भाडेवाढ केल्याने घाऊक तसेच किरकोळ बाजारात अन्नधान्याच्या दरांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसराला होणारी जीवनावश्यक वस्तूंची आवक स्थिर असतानाही किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. डाळींच्या दरांतही किलोमागे १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असले तरी इंधन दरवाढीचे कारण पुढे करत किरकोळ बाजारात ग्राहकांची लूट सुरू आहे.

वाहतूक खर्च वाढल्याने घाऊक बाजारात भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी किरकोळ विक्रेते इंधन दरवाढ आणि टाळेबंदीच्या नावाखाली भाज्यांची दुप्पट दराने विक्री करत आहेत. करोनाची संभाव्य तिसरी लाट आणि करोनाच्या उत्परिवर्तित प्रकाराच्या भीतीमुळे राज्यात २८ जूनपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने तसेच बाजारपेठा सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नव्या नियमानुसार विक्रीचा कालावधी कमी झाल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी वस्तूंच्या किमतींत आणखी वाढ केल्याचे आढळते.

मुंबई महानगर क्षेत्रात किरकोळ बाजारात भेंडी (६०-८० रुपये किलो), कांदा (३५ ते ४०), फ्लावर (४० ते ६० रुपये), गवार (८० ते १०० रुपये), कारली (६० ते ८० रुपये) अशा प्रमुख भाज्यांची विक्री अवाच्या सवा दराने होत आहे. घाऊक बाजारात २२ रुपये प्रति किलोने विकला जाणारा दुधी भोपळा किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपयत आहे. घाऊक बाजारात ११० रुपये प्रति किलोने विकली जाणारी फरसबी किरकोळ बाजारात १२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. घाऊक बाजारात १२० रुपये किलो असलेला मटार किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपयांनी विकला जात आहे.

गेल्या पंधरवड्यापासून डाळींच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे. डाळींच्या दरात वाहतूक खर्चाची बाजू नेहमीच महत्त्वाची मानली जाते. इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याने डाळींचे घाऊक आणि किरकोळ दर वाढले असून तूर, मसूर, मूग डाळींचे दर १२० ते १४० रुपयांवर गेले आहेत.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांसह खरेदीदारांना थेट झळ पोहोचली आहे. किरकोळ बाजारात अन्नधान्याच्या दरात वाढ झाली असून डाळी, साखर, तेलाचे दर तेजीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून डिझेल-पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्याने शेतमाल वाहतूकदारांनी भाडेआकारणीत वाढ केल्याने त्याची परिणती किरकोळ बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीत झाली आहे. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर तसेच परराज्यांतून भाजीपाल्याची आवक होते.

पावसाने ओढ दिल्याने मुंबईची परसबाग म्हणजे नाशिकच्या घाऊक बाजारात भाज्याचे दर वधारल्याने किरकोळ बाजारातील ग्राहकांच्या रोजच्या खर्चात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात गावठी कोथिंबिरीच्या १०० जुड्यांना सरासरी ३०५० रुपये, तर संकरित २२०० रुपये, मेथी १७००, शेपू १८०० आणि कांदा पात २००० रुपये अशी दरवाढ झाली आहे. मुंबईला कांदा नेण्यासाठी पूर्वी क्विंटलला ११० रुपये खर्च येत होता, इंधन दरामुळे आता तो १४० रुपयांवर पोहोचला आहे. भाजीपाला पाठविण्याचा प्रत्येक पोत्याचा खर्च १० ते २० रुपयांनी वाढला. नाशिकमधून दररोज १५० वाहने मुंबईसह उपनगरात भाजीपाल्याचा पुरवठा करतात.

नागपुरात पेट्रोल १०६ तर डिझेल ९५ रुपयांच्या वर गेल्याने फळभाज्यांसह डाळींच्या दरात ७ टक्के अशी मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे डाळी किरकोळ बाजारात १० ते १५ रुपयांनी रुपयांनी महागल्या आहेत. फळेही २ ते ४ टक्क्यांनी महाग झाली आहेत. नागपुरात बहुतांश डाळी अन्य राज्यांतून येतात. त्यामुळे इंधन दरवाढ झाल्याने व्यावसायिकांच्या वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात तूरडाळ ५५ रुपये प्रति किलो होती, आता ६८ रुपये झाली आहे. मूगडाळ ४५ होती, आता ५५ रुपयांवर गेली आहे. उडीद डाळ साठवणुकीच्या नव्या नियमात बसत नसल्याने तिचे दर स्थिर आहेत.

औरंगाबादसह मराठवाड्यातील बहुतांश शहरात तेल आणि तूरडाळीचे वाढलेले भाव कायम आहेत. दोन आठवड्यांपूर्वी तूरडाळ, मूग आणि उडीदडाळीच्या भावात झालेली वाढ आता काहीशी घसरणीला लागली असून ती घसरण सरासरी तीन ते चार रुपये प्रति किलो असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तूरडाळीचा किरकोळ बाजारातील ९२ ते ९४ रुपये दर आता ८७ रुपयांपर्यंत कमी झाला आहे. खाद्यतेलाचे वाढलेले भाव १४५ रुपयांवर स्थिरावले आहेत. कांद्याचे दर प्रति किलो २० रुपयांपर्यंत गेले असून कोबी, वांगे, फ्लावर याचे दर वाढले आहेत.

नागपुरात भाज्यांसह डाळींच्या दरात ७ टक्के दरवाढ झाली आहे. पुण्यात किरकोळ बाजारात डाळी, साखर, तेलाचे दर तेजीत आहेत. नाशिकहून येणाऱ्या कांद्याचा वाहतूकखर्च क्विंटलमागे ३० रुपयांनी आणि भाजीपाल्याचा वाहतूकखर्च १० ते २० रुपयांनी वाढल्याने मुंबई-ठाणेकरांना महागाईची झळ बसत आहे.

मासेमारी दोन महिने बंद असल्याने गुजरातमधून मासे मागवले जात आहेत. इंधनदरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलोने मिळणाऱ्या सुरमई, पापलेटसाठी एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. कोळंबी ६०० आणि बोंबिल, बांगडा ३०० रुपये किलो झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.