देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने आकाशाला भिडत आहेत. बर्याच राज्यात पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांपेक्षा जास्त दराने मिळत आहे. अशा परिस्थितीत लोक महागाईचा सामना करण्यासाठी पर्याय शोधू लागले आहेत. दरम्यान, तामिळनाडूतील मदुराई मधील धनुष कुमार या तरुणाने सोलार पॅनेलच्या सहाय्याने इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. ही सायकल इंटरनेटवर चर्चेत आहे.
या सायकलची खास गोष्ट म्हणजे ती एका वेळी चार्ज केल्यानंतर त्या चार्जिंगवर ५० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. बॅटरी डिस्चार्ज झाल्यावरही आपण सायकल जवळ जवळ २० किलोमीटर पर्यंत चालवू शकतो. या सायकलवरून ५० किमीपर्यंत प्रवास करण्याचा खर्च अवघा १.५० रुपया येतो. “ही सायकल ३०-४० किमी प्रतितास वेगाने धावू शकते, म्हणूनच मदुराईसारख्या छोट्या शहरांसाठी ही सायकल खूप उपयुक्त आहे”, असं धनुष कुमार सांगतो. धनुषची ही सायकल काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. परंतु आता पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे ती मदुराईमध्ये लोकप्रिय होत आहे.
या सायकलमध्ये एक बॅटरी बसवलेली आहे, जी सूर्यप्रकाशाने चार्ज होते. या ई-सायकलमध्ये १२ व्होल्टच्या ४ बॅटरी आहेत. ३५० वॅटची ब्रश मोटर आहे. वेग वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एक्सलरेटरही बसविण्यात आले आहे. सायकलची बॅटरी चार्ज करण्यासाठी २० वॅटचे २ सोलार पॅनेल बसविण्यात आले आहेत.