कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, अनेक तज्ज्ञ, टास्क फोर्स आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पंतप्रधान मोदी आपल्या निर्णयाचा फेरविचार करु शकतात, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे. मात्र, त्यापूर्वी दुर्बल घटकांची योग्यप्रकारे सोय करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तर काल दिवसभरात तब्बल 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 पर्यंत पोहोचली आहेत. तर दुसरीकडे 3417 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा हा 2 लाख 18 हजार 959 इतका झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात 3,00,732 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 इतकी झाली आहे.