मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची उद्या 1 मे महाराष्ट्र दिनी होणारी सभा महत्त्वाची मानली जात आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. या सभेच्या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज्यातील सौहार्द, सामंजस्याचे वातावरण बिघडू देऊ नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांचेदेखील कान टोचले आहेत. आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान जर कुणी करीत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच माझे सर्वांना, अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांना देखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊ यात, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि हे करतांना महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकाविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस शुभेच्छा दिल्या आहेत.