हेरगिरी स्पायवेअर भारताने
खरेदी केल्याचा अहवाल
आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र न्यूयार्क टाईम्सने इस्राईलमधील एनसओ कंपनीने निर्माण केलेल्या पेगसेस या हेरगिरी स्पायवेअर बाबत (Pegasus Spyware) गंभीर खुलासे केले आहेत. यात भारतासह काही देशांनी पेगसेस स्पायवेअरची खरेदी केल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे पेगसेस खरेदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१७ मधील इस्राईल भेटीचाही संबंध असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे भारतात काँग्रेससह विरोधकांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत.
भाजपने देशाला बिग बॉसचा
कार्यक्रम बनवून ठेवले : शिवसेना
शिवसनेनेही याप्रकरणी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदींनी पेगॅससवरुन भाजपाचे सरकार असेल तर हे शक्य आहे असे म्हटले आहे. “भारताने २०१७ मध्ये इस्रायलशी संरक्षण कराराचा भाग म्हणून पेगॅसस खरेदी केले. स्पायवेअरचा वापर संरक्षण उद्देशांसाठी नाही तर विरोधक आणि पत्रकारांची हेरगिरी करण्यासाठी केला जातो. भाजपा असेल तर शक्य आहे. देशाला बिग बॉसचा कार्यक्रम बनवून ठेवला आहे,” असे प्रियंका चतुर्वेदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पदवी शिक्षण अभ्यासक्रम
आता 4 वर्षांचा होणार
विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. पदवीचं शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी आहे. पदवी शिक्षण अभ्यासक्रम आता 3 वर्षांऐवजी 4 वर्षांचा होणार आहे. अभ्यासक्रम कालावधीबाबत राष्ट्रीय शिक्षण धोरण संदर्भातील डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात आला आहे. माशेलकर समितीच्या शिफारशींवर मुख्यमंत्री ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे. शिफारशींनुसार पदवीसाठी अभ्यासक्रम चार वर्षे करण्याबाबत योजना आहे.
टीईटी गैरव्यवहार प्रकरणी
आयएएस अधिकार्यास अटक
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणी आज (शनिवार) पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कृषी विभागातील आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला ठाण्यातून अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर यांना आज दुपारी ठाण्यातून अटक केली. ते २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून ते कार्यरत होते.
पबजी गेम मुळे भांडण, मुलाने केली
कुटुंबातील सदस्यांची हत्या
पबजी मोबाईलवरच्या या गेममुळे लहान मुलांना त्याचं वेड लागल्याची तक्रार अनेकदा पालक करताना दिसतात. पाकिस्तानमध्ये अशीच एक भीषण घटना घडली आहे. पाकिस्तानच्या लाहोरमधील काहन भागामध्ये गेल्या आठवड्यात ४५ वर्षीय नाहिद मुबारक, त्यांचा २२ वर्षांचा मुलगा तैमुर आणि त्यांच्या इतर दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह पोलिसांना त्यांच्या राहत्या घरात आढळून आले होते. कुटुंबातल्या चौघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या सर्व कुटुंबात सर्वात लहान १४ वर्षीय अल्पवनीय आरोपी जिवंत राहिला होता. चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला.
सध्या चिंता करण्याची
आवश्यकता नाही : टोपे
तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू येऊन गेला आहे असं म्हणता येईल. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी अचानक बाधितांची संख्या वाढत होती. ती आता तशी नाही. पण राज्याच्या इतर भागात त्याची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही वाढत आहे. पण सर्वजण ५ ते ७ दिवसांच्या उपचारांवर बरे होत आहेत. त्यामुळे इतर भागात वाढणारी बाधितांची संख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही”, असं टोपे म्हणाले.
ब्राह्मोसच्या निर्यातीसाठी
फिलिपाईन बरोबर करार
फिलिपाइन्सच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’शी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ३७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. भारताला मिळालेला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा हा पहिला देकार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारत-रशियन संयुक्त उपक्रमातून ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे.
वाईन आणि दारू यात जमीन
आस्मानाचा फरक : अजित पवार
वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळं आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी
तिघांना सहा वर्षांची शिक्षा
आध्यात्मिक आणि राजकीय गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर न्यायालयाने शुक्रवारी (28 जानेवारी) मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी तिघांनी दोषी ठरवलं आहे. इंदूर जिल्हा न्यायालयाने मुख्य सेवादार विनायक, ड्रायव्हर शरद आणि एका महिलेला म्हणजेच पलकला दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने तिघांना एकूण 6 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी आत्महत्या केली होती.
भाजप सर्वात श्रीमंत राजकीय
पक्ष 4847.78 कोटीची संपत्ती
राजकीय पक्षांना अनेक ठिकाणांहून निधी आणि देणगी मिळत असते. देशात उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यावेळी कोणता राजकीय पक्ष श्रीमंत आहे, याची माहिती पुढे आली आहे. भाजप सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर बसपा आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे?
अर्थसंकल्पात पायाभूत
सुविधांवर सरकारचा भर
1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारमण त्यांचा सलग तिसरा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना काळात खरंतर ही गोष्ट आव्हानात्मक आहे. महागाई आणि महामारी अशा कात्रीत देशाचा रहाटगाडा चालविण्याची मोठी कसरत या सरकारला करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य भारतीय नागरिकांची अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अर्थसंकल्पात सरकारचा भर पायाभूत सुविधांच विकास करणे हा आहे. परंतू महागाईसह महामारीचा सामना करणा-या सर्वसामान्य नागरिकांच्या हाती विशेष काही लागण्याची शक्यता धुसर आहे.
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी
ॲमेझॉनचे सहकार्य
राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सूचना करणे यासाठी ॲमेझॉन(Amazon)ने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब(Tab) वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तांत्रिक सहकार्यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे.
SD social media
9850 60 3590