अस्पृश्यता देव मानत असेल, तर असा देव मानायला मी तयार नाही, असं विधान लोकमान्य टिळक यांनी म्हटलं होतं. अस्पृश्यता निवारण परिषदेत लोकमान्य टिळक यांनी हे विधान केलं होतं. पण याच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेवेळी महात्मा गांधीसोबत घडलेला एक प्रसंग ऐतिसाहिक आहे. गांधीची ज्या दिवशी हत्या झाली, त्या दिवशी नेहरुंनी जेव्हा याबाबतचं वृत्त संपूर्ण देशाला रेडिओवरुन संबोधित करताना दिलं होतं, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. पण जेव्हा टिळकांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत महात्मा गांधी यांनी जे भोगलं, ती घटनाही देशातील जातीभेदाची भिंत किती उंच बनली होती, हे पाहून गांधीना देखील हादरा बसला होता. 30 जानेवारीला गांधींची हत्या झाली. त्यांच्या हत्येला अनेक वर्ष झाली. पण आजही गांधीजी यांच्या विचारांनी त्यांना जिवंत ठेवलंयस हे अधोरेखित करणारी ही घटना लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेत घडली होती.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेत गांधी होते. त्यांच्या अंत्ययात्रेत टिळकांना खांदा द्यायला गांधी पुढे गेले. तेव्हा त्यांना मागे खेचण्यात आल्याचं चंद्रकात वानखेडे यांनी आपल्या एका भाषणात म्हटलंय. अक्षरशः गांधींना अंत्ययात्रेत मागे खेचलं जातं. त्यांना सांगितलं जातं की, तुम्ही ब्राम्हण नाही आहात, त्यामुळे टिळकांच्या शवाला खांदा देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ही वाक्य ऐकून गांधीजींना मोठा धक्काच बसला होता. देशातील जातीभेदाचा सामना राष्ट्रपित्यालाही करावा लागला होता, हे या घटनेतून सिद्ध होते.
दरम्यान, जेव्हा अंत्ययात्रेत गांधीजींसोबत हा प्रसंग घडला, तेव्हा गांधीजी प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांना मोठा हादराच बसला होता. अखेर गांधी पोटतिडकीनं पेटून उठले आणि यानंतर त्यांनी प्रचंड आक्रमकपणे जी गोष्ट केली, त्याचा किस्साही चंद्रकात वानखेडे यांनी आपल्या भाषणात नमूद केलाय.
1915 मध्ये गांधी भारतात परतले. 1917 मध्ये ते आपल्या स्वातंत्र्य चळवळीची दिशा स्पष्ट करताना गांधीजींनी म्हटलं होतं की, या देशाच्या सर्वोच्च पद्दी भंग्याची किंवा चांभाराची मुलगी असेल, हे माझं स्वप्न आहे. यावरुनच गांधीजींनी जातीभेदाच्या भिंती तोडण्यासाठी, धर्मभेदाची दरी कायमची मिटवण्यासाठी किती तळमळीनं प्रयत्न करायचे होते, हे अधोरेखित होतं. इतकंच काय तर 1920 मध्ये गांधी स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याच्या नेतृत्त्वाच्या केंद्रस्थानी येतात आणि 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होते, हा देखील योगायोगाचा भाग नाही, असं देखील चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय.
गांधींची 30 जानेवारीला हत्या करण्यात आली. मात्र त्यांच्या हत्येनंतर आजही गांधी फक्त भारतातच नाही तर जगभरात आपल्या विचारांमधून जिवंत आहे. आपल्या अलौकिक विचिरांनी त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. ही प्रेरणा इतकी ताकदवर होती आणि प्रभावशाली होती, की भारतात कुणालाच गांधींना टाळून पुढे जाता येत नाही. आश्चर्याची गोष्ट अनेकदा गांधींना सोबत ठेवणंही अनेकांना जड जातं, तेही याच कारणामुळे.