गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाचा सामना करत असून मास्कचा वापर सध्या बंधनकारक आहे. मात्र राज्यात लवकरच मास्क घालण्याच्या सक्तीतून लवकरच सूट मिळण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मास्क घालणं बंधनकारक नसल्याच निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनणार का? महाराष्ट्र सरकारने या मुद्द्यावर विचार सुरू केलाय.
कोरोना व्हायरसने जगात एन्ट्री घेतल्यापासून मास्क हा महत्त्वाचा भाग बनलाय. दरम्यान असे अनेक देश आहेत जिथे मास्क घालणं आता बंधनकारक नाहीये. संपूर्ण लसीकरणानंतर इस्रायलने आपल्या देशातील नागरिकांना मास्कच्या वापरापासून सुटका दिली. यानंतर ब्रिटन, अमेरिका, स्वीडन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली आणि चीननेही मास्कबाबत मोठा निर्णय घेतला.
यानंतर आता महाराष्ट्र राज्य देखील यामध्ये सहभागी होऊ शकतं. कोविड टास्क फोर्सने ज्या देशांत मास्कची बंधनकारकता रद्द केली आहे, त्या देशांचा अभ्यास करावा, असा मुद्दा महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत आला होता. टास्क फोर्सचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची घोषणा केलीये.
कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्या म्हणण्यानुसार, मास्कचा वापर बंधनकारक नसल्याचा निर्णय घेतलेल्या इतर देशांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. अभ्यासानंतर त्याचा अहवाल तयार करून सरकारला दिला जाईल. मात्र, राज्याला मास्क फ्री व्हायला वेळ लागेल. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस राज्यात कोरोना विरुद्धच्या लढाईत मास्कची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कमी झाल्याचं चित्र दिसून येतंय. राज्यात गुरुवारी 2 लाख 87 हजार 397 सक्रिय रुग्ण आढळले. गेल्या आठवडाभरापासून राज्यात दररोज सरासरी 25 हजार नवीन रुग्ण येतायत.