नागपूर महानगरपालिका 75 ऑक्सिजन उद्यान विकसित करणार असल्याची माहिती आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करुन शहरात 75 ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे.
जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करुन शहरात 75 ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे, अशी घोषणा महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.
शनिवारी (5 जून) जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने नागपुरातील गांधीबाग उद्यानात 1200 प्राणवायू वृक्षांची लागवड करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, सरला नायक, उपायुक्त रवींद्र भेलावे, अमोल चौरपगार, नागमोते उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले, उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पूर्व नागपूर येथे वृक्षांची संख्या फारच कमी आहे. मनपातर्फे सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानात, खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल. येथे वनौषधी सुद्धा लावण्यात येतील. याचा लाभ आयुर्वेदचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. पोहरा नदीच्या काठालगत सुध्दा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापौर आणि अन्य उपस्थित नागरिकांनी वृक्षारोपण करुन मोहिमेचा शुभारंभ केला.
याप्रसंगी अधिवक्ता प्रकाश जयस्वाल, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, नरेंद्र सतीजा, किशोर पालांदूरकर, रामभाऊ आंबुलकर उपस्थित होते.
नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी चिंताजनक असल्याचा अंदाज अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. अशावेळी लहान मुलांना कोरोनाची लस महत्वाची ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात आजपासून लहान मुलांवर कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता लहान मुलांना कोरोनाचा पहिला डोस दिला जाणार आहे. नागपुरातील मेडिट्रिना रुग्णालयात ही चाचणी होणार आहे. लहान मुलांना त्यांच्या वयानुसार 3 गटात विभागून कोरोनाची लस दिली जाणार आहे.