खासदार संभाजीराजे भोसले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. अनेकदा राज्य सरकारसोबत देखील त्यांनी यासंदर्भात चर्चा केली असून या चर्चेच्या फेऱ्यांमधून देखील मराठा समाजाचं समाधान झालेलं नसल्याचं त्यांनी वारंवार ठामपणे सांगितलं आहे. यासंदर्भात आता संभाजीराजे भोसले लवकरच राज्यभर दौरा करणार असल्याचं देखील सांगितलं जात असताना वेगळ्याच गोष्टीची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या संभाजीराजे भोसले यांना श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करू दिला नसल्याची बाब उघड झाली आहे. यासंदर्भात संभाजीराजे भोसले यांनी देखील फोनवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. या घटनेत संभाजीराजे भोसलेंचा अपमान झाल्याचा दावा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आला आहे.
संभाजीराजे भोसले दर्शनासाठी तुळजापूरला तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. यासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. या घटनेवेळी मंदिरातून बाहेर पडताना संभाजीराजे भोसले यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
यासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चानं तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र पाठवलं आहे. “संभाजीराजे भोसले तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले असता कुठलाही प्रोटोकॉल न पाळता त्यांना दर्शन घेण्यासाठी सहजनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी गाभाऱ्यात येण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज संभाजीराजे भोसले यांचा अवमान केल्याने छत्रपती प्रेमींचे मन दुखावले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं. या कारवाईची प्रत द्यावी. अन्यथा दप्तर दिरंगाई कायद्यानुसार वाट पाहून बोंब मारो आंदोलन करण्यात येईल”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.