नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कोरोना महामारीनंतर हळूहळू रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. सरकारकडूनही रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे पश्चिम-मध्य रेल्वेनं विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदभरतीबद्दलची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘झी न्यूज’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
पश्चिम-मध्य रेल्वेच्या रेल्वे भरती सेलनं एनटीपीसी पदांसाठी जीडीसीई कोटाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची सूचना जारी केली आहे. यात स्टेशन मास्तर, स्टेशन कमर्शिअल कम तिकिट क्लार्क आणि सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट, कमर्शिअल कम तिकिट क्लार्क, अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्ट आणि ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट या पदांचा समावेश आहे. एनटीपीसी पदवीधरांसाठी 55 रिक्त जागा आहेत. 12 वी पास असणाऱ्यांसाठी 66 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी सिंगल स्टेज कम्प्युटर आधारित टेस्ट (सीबीटी) घेतली जाणार आहे. त्यानंतर अॅप्टिट्यूड टेस्ट/ टायपिंग स्किल टेस्टही (ज्या पदांसाठी लागू असेल) घेतली जाणार आहे.
9 जुलैपासून या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. 28 जुलै ही अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख असणार आहे. स्टेशन मास्तर, सीनिअर कमर्शिअल कम तिकिट क्लार्क आणि सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट या पदांसाठी उमेदवार पदवीधर असण्याची आवश्यकता आहे. कमर्शिअल कम तिकीट क्लार्क, अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्ट, ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट या पदांसाठी 12 वी पास उमेदवारही अर्ज करू शकतात.
रेल्वे भरती प्रक्रिया
रेल्वे भरतीसाठी उमेदवारांना वेगवेगळ्या प्रवर्गांनुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 ते 42 वर्षं अशी आहे. ओबीसी उमेदवारांसाठी 45 वर्षं ही वयोमर्यादा आहे. एससी, एसटी वर्गातल्या उमेदवारांना ही वयोमर्यादा 47 वर्षं अशी आहे. स्टेशन मास्तरच्या पदासाठी महिन्याला 35400 रुपये, सीनिअर कमर्शिअल कम तिकीट क्लार्कच्या पदासाठी 29,200 रुपयांचं वेतन असेल. कमर्शिअल कम तिकीट क्लार्कच्या पदासाठी 21,700 रुपये, अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्टसाठी 19,900 रुपये, तर ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट उमेदवारांना महिन्याला 19,900 रुपयांचं वेतन मिळेल.