औरंगाबादच्या किराणा दुकानात सापडल्या बँके पेक्षा अधिक नोटा

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तांदूळ व्यापाऱ्याकडे छापा टाकून पोलिसांनी 1 कोटी 9 लाख रुपये जप्त केलेत. हा सगळा व्यवहार हवालाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्या दृष्टीने आता जीएसटी आणि आयकर विभाग तपासणी करणार आहे. याच दुकानातून शहरातील हवाला व्यवहार होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

औरंगाबादेत पोलीस काही दिवस या दुकानावर लक्ष ठेवून होते. या दुकानात मशीननं नोटा मोजणं सुरू असल्याचं कळल्यावर पोलिसांनी छापा टाकला, यावेळी दुकानातलं चित्र पाहून पोलीसही चक्रावले.

औरंगाबादमधल्या चेलीपुरा भागात सुरेश राईस नावाचं दुकान आहे. या दुकानातून हवाला रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानंतर पोलिसांनी या दुकानावर लक्ष ठेवलं. अनेक लोकं दुकानात जात होती, पण कोणतंही सामान न घेता रिकाम्या हाताने बाहेर येत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
पोलिसांना संशय आल्याने दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानाच्या ड्रॉव्हरमध्ये 200 आणि 500 रुपयांच्या नोटांची बंडलं आढळून आली. पोलिसांनी दुकानाच्या मालकाकडे याबाबत विचारणा केली. पण त्याला याचं उत्तर देता आलं नाही. हे पैसे हवालाचे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आयकर आणि जीएसची विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं.
पोलिसांच्या तपासात दुकानात तब्बल 1 कोटी 9 लाख 50 हजारांची रोकड सापडली. याशिवाय मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप झाल्याचा संशयही पोलिसांना आहे.
आयकर आणि जीएसटी विभागातर्फे या प्रकरणाचा तपास केला जाणार असून हे पैसे कुठून आले, कोणाला दिले जात होते, याची चौकशी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.