विराट कोहली अन् केएल राहुलचे पुनरागमन तर दुखापतग्रस्त बुमराह बाहेर
येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. तेव्हापासून भारतीय संघाची निवड कधी होणार याची प्रतिक्षा चाहत्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवडलेल्या संघात विराट कोहली आणि केएल राहुलचे पुनरागमन झाले आहे. तर, पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहचा संघात समावेश केलेला नाही.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५सदस्यीय संघाची निवड केली आहे. निवडलेल्या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. प्रदीर्घकाळाच्या दुखापतीनंतर संघात परतलेल्या केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. राहुल व्यतिरिक्त माजी कर्णधार विराट कोहलीदेखील संघात परतला आहे. टी २० विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये परत येण्यासाठी आशिया कप विराट कोहलीसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल. तर, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा अष्टपैलू कामगिरीची धुरा सांभाळतील. गोलंदाजीमध्ये भारताकडे रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान हे पर्याय असतील. जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे संघात निवडण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो आशिया चषकामध्ये खेळणार नाही. तो आमचा प्रमुख गोलंदाज आहे. टी २० विश्वचषकापूर्वी त्याने पुनरागमन करावे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आशिया चषकामध्ये त्याला सहभागी करून धोका पत्करता येणार नाही. अशाने त्याची दुखापत वाढू शकते.
आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार होते. मात्र, तेथील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती बघता आशिया चषक श्रीलंकेतून यूएईमध्ये हलवण्यात आला आहे. स्पर्धा जरी श्रीलंकेत होणार नसली तरी, लंकेकडे यजमान पदाचे सर्व अधिकार असतील. आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. हा सामना दुबई येथे होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. दोघांचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्रुप स्टेजच्या सामन्यांनंतर ‘सुपर फोर’ टप्पा असेल आणि सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील.
आशिया चषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल.