समर्पण आश्रम, दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर 16 व्या गहन ध्यान अनुष्ठानाचा पूर्णाहुती सोहळा संपन्न झाला. समर्पण ध्यानयोगाचे प्रणेते, हिमालयीन सद्गुरु, महर्षी श्री शिवकृपानंद स्वामीजी गेल्या 15 वर्षांपासून समर्पण आश्रम, दांडी इथे 45 दिवसांचे गहन ध्यान अनुष्ठान करत आहेत. या वर्षीच्या अनुष्ठानामध्ये आश्रमात सरकारच्या कोविडच्या निर्देशांचे पालन करून ‘गुरुग्राम’ नावाच्या एका छोट्याशा गावाची व्यवस्था करण्यात आली होती. देश-विदेशातून आलेल्या लोकांनी जात, भाषा, धर्म, देश, रंग असे भेद ओलांडून गुरुग्राममध्ये ४५ दिवस वास्तव्य केले, ध्यानसाधनेत सहभाग घेतला व दिव्य चैतन्याचा लाभ घेतला.
महाशिवरात्रीच्या पावन दिनी हे गहन ध्यान अनुष्ठान पूर्ण होते आणि पूज्य गुरुदेव एकांतातून बाहेर येतात. या दिवशी सामूहिक ध्यानाचे एक महाशिबिर असते , ज्यामध्ये पूज्य गुरुदेव आपल्या आशीर्वचनांद्वारे अमूल्य आध्यात्मिक मार्गदर्शन करत चैतन्याचा वर्षाव करतात. या दिवसाची साधक आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे कोणताही मोठा कार्यक्रम ऑफलाइन झाला नव्हता आणि पूज्य स्वामीजींच्या प्रत्यक्ष दर्शनाचा वा सान्निध्याचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे या महाशिबिराची सूचना मिळताच साधकांनी दांडीकडे धाव घेतली. मध्यरात्रीपासून, ज्यांना जसं साधन मिळेल तसं प्रत्येक जण आश्रमात पोहोचू लागले. पहाटे चार वाजल्यापासूनच साधक सभामंडपात येऊन बसू लागले. सकाळी सुमारे साडे पाच पासून जवळजवळ हजारो साधकांनी सामूहिक ध्यान केले. त्यानंतर नियोजित वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता परमपूज्य गुरुदेवांचे सभामंडपात आगमन झाले. दोन वर्षे साधक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तोच हा क्षण होता! भावविभोर झालेल्या साधकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांना त्यांचे आनंदाश्रू आवरता येत नव्हते. टाळ्यांच्या कडकडाटाने वातावरण दुमदुमून गेले!
पूज्य स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनात मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्याला जन्माला येण्याचे कारण म्हणजे, आपले विचार असतात आणि विचार आपल्या संगतीमुळे अधिक प्रभावित होतात. आपण ज्या सामूहिकतेत राहतो, तसे विचार येतात आणि हेच विचार जन्म घेण्याचे कारण बनते. पूज्य स्वामीजी कर्माविषयी सांगताना म्हणाले की, मनुष्य पूर्वजन्मीचे कर्म भोगण्यासाठी जन्म घेतो, परंतु ते भोगत असताना तो नवीन कर्म करतो आणि ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेतो आणि अशा प्रकारे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकला जातो. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे – आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार प्राप्त करून, ध्यानाद्वारे अहंकाराचा लय करून, मनुष्य आपले सर्व कर्म करत असतो, दैनंदिन जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत असताना, कर्ममुक्त अवस्था किंवा मोक्षाची स्थिती जिवंतपणीच प्राप्त करू शकतो आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवू शकतो. ते पुढे म्हणाले की, गुरु शक्तींनी हे वर्ष ‘समर्पण वर्ष’ घोषित केले आहे, तर या वर्षी तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ध्यान करा. त्यांनी सांगितले की, गुरुशक्तींनी संकेत दिला आहे की येणारा काळदेखील विश्वासाठी अनुकूल नाही, संकटांची रूपे भिन्न भिन्न असू शकतात, म्हणून नियमित ध्यान करून आपली स्थिती चांगली करा. पुढे त्यांनी गुरुकार्य, दानधर्म, नियमित ध्यान, आत्मसाक्षात्कार हे विषय सहजरित्या समजावून सांगितले. दि.11 ते 13 एप्रिल 2022 या कालावधीत, गुजरात विधानसभेत ध्यान शिबिर होणार असल्याचा शुभ समाचार त्यांनी दिला. त्यामुळे तुमच्या क्षेत्रातील आमदारांशी मग भले ते कोणत्याही पक्षाचे असले तरी, त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना ध्यानाद्वारे आलेल्या तुमच्या चांगल्या अनुभूती सांगा. तसेच पुढे त्यांनी हे सांगितले की, जर तुमच्या विभागातील आमदार ध्यानाशी जुडले गेले, तर तुमच्या विभागात अधिक चांगले कार्य होईल. परम करुणानिधी गुरुदेवांनी शेवटी त्यांना सकाळीच झालेला काशी विश्वनाथाचा अनुभव सर्वांना सांगितला.
नंतर पूज्य गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान झाले, ज्यायोगे साधकांनी त्यांच्या त्या अनुभवाशी जोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी परमपूज्य गुरुदेवांनी सर्व साधकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम हीच शक्ती आहे, असे सांगून आभार मानले आणि सभामंडपातून प्रस्थान केले. नंतर भावपूर्ण भजनांचा आनंद घेत घेत सर्वांनी पादुका नमनाचा लाभ घेतला. शेवटी महाप्रसादच्या कार्यक्रमाने महाशिबिराची पूर्णाहुती झाली.
अशा प्रकारे विशाल आत्मिक सामूहिकतेचा ‘गहन ध्यान अनुष्ठान’चा उत्सव मोठ्या उत्साहात, चैतन्यात आणि शांततेत संपन्न झाला.
या 45 दिवसीय अनुष्ठान आणि महाशिवरात्रीच्या महाशिबिराची सर्व व्यवस्था श्री अंबरीशजींच्या नेतृत्वाखाली ‘गुरुतत्त्व’ मंचाने सांभाळली होती.