आशिया चषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. अफगाणिस्तानने १२८ धावांचे लक्ष्य गाठत बांगलादेशवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तान संघ सुपर ४ मध्ये पोहोचला आहे. नजीबुल्ला झदरानने अवघ्या १७ चेंडूंमध्ये तब्बल ४३ धावा करून अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. दरम्यान, या विजयानंतर सुपर -४ मध्ये प्रवेश करणारा अफगाणिस्तान हा पहिला संघ ठरला आहे.
गुणतालिका अफगाणिस्तान अव्वल
ग्रुप ब मध्ये अफगाणिस्ताने आपले दोन्ही सामने जिंकले असून ४ गुण आणि +२.४६७ नेट रनरेटसह ते पहिल्या क्रमांवर आहे. तर बांगलादेश आणि श्रीलंका शून्य गुणांसह अनुक्रमे -०.७३१ आणि -५.१७६ नेट रनरेटसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकवर आहे.
तर ग्रुप ए मध्ये भारत एक सामना जिंकत २ गुण आणि +०.१७५ नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर हॉंगकॉंग आणि पाकिस्तान शून्य गुणांसह अनुक्रमे ०.००० आणि -०.१७५ नेट रनरेटसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकवर आहे. हॉंगकॉंग पहिला सामना आज (३१ ऑगस्ट ) भारताबरोबर आहे.
अफगाणिस्तानचा बांगलादेशवर विजय
बांगलादेशने नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय सुरुवातीला काहीसा चांगला ठरला नाही. अफगाणिस्तानच्या नजीब उर रहमान याने बांगलादेशच्या पहिल्या फळीतील तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. फलंदाज मोहम्मद नईम (६), अनामुल हक (५) स्वस्तात बाद झाले. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या शकीब अल हसनने ११ धावा केल्या.
दरम्यान, बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १२८ धावांचे लक्ष्य गाठताना अफगाणिस्तानचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. हजरतुल्ला झाझाई (२३, पायचित), रहमानउल्ला गुरबाज (११, यष्टिचित) हे दोन्ही सलामीवीर खास कामगिरी करू शकले नाहीत. त्यानंतर इब्राहीम झदरान-नजीबुल्ला झदरान या जोडीने संघाला विजयापर्यंत नेलं. दोघांनीही मोठे फटके मारत बांगलादेशच्या हातातून विजय खेचून आणला. नाबाद खेळी करत इब्राहीम, नजीबुल्ला यांनी अनुक्रमे ४२ आणि ४३ धावा केल्या. ज्यामुळे अफगाणिस्तानला विजयाची गोडी चाखता आली.